भुसावळातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरमध्ये तीन कोटींच्या निधीतून विविध कामे होणार

आमदार संजय सावकारे यांचा यशस्वी पाठपुरावा ः निविदा प्रक्रियेला सुरवात

भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे

शहरातील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरमध्ये विविध कामांसाठी तीन कोटी 97 लाख 2 हजार 686 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आता निविदा प्रक्रिया राबवली असून त्यातून संरक्षण भिंत, शवविच्छेदन कक्ष, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरला जोडणार्‍या मार्गावर शेड उभारणी आदी कामे होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सा.बां.विभागाने काढली निविदा
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यानंतर ट्रामा केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. कोविडच्या काळात शहर व तालुकावासीयांना मोठा फायदा त्यामुळे झाला तर या इमारतीतील उर्वरीत कामांनाही निधी मिळण्यासाठी आमदार सावकारे यांनी प्रयत्न केले होते. यानुसार दोन कोटी 97 लाख 2 हजार 686 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून आता या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवली आहे. या निधीतून ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअरच्या दोन्ही इमारतींसाठी संरक्षण भिंत उभारणी करणे, ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी स्वतंत्र अद्ययावत कक्षाची उभारणी करणे, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटरच्या दोन्ही इमारतींना जोडण्यासाठी कॉरीडॉरवर शेड उभारणी करणे आदींसह अन्य उर्वरीत राहिलेल्या कामांचा समावेश आहे. या कामांमुळे रुग्णांच्या सेवा, सुविधांमध्ये वाढ होणार आहे.

पालकमंत्र्यांचे मनापासून आभार : आमदार सावकारे
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागणी केल्यानंतर व पाठपुरावा निधीची उपलब्धता झाली असून त्याबद्दल आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. लवकरच ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी स्वतंत्र अद्ययावत कक्षाची उभारणी होणार असून अन्य कामेदेखील होणार असल्याने रुग्णांना सेवा-सुविधा मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.