भुसावळ- सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या चौघांना प्रांताधिकार्यांनी हद्दपार केले आहे. याबाबतचे आदेश काढल्यानंतर गुरूवारी पोलिसांकडून आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुकेश प्रकाश भालेराव (रा. टेक्निकल हायस्कूलजवळ), प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.पंढरीनाथ नगर), शेख चाँद शेख हमीद (रा.दीनदयाल नगर) आणि अजय गिरधारी गोडाले (रा.पंधरा बंगला, लाल मंदिराजवळ) अशी हद्दपार झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या प्रस्तावानंतर कारवाई
गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी यासाठी पोलिसांनी उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवले होते. तेथून मंजुरी मिळाल्यावर हे प्रस्ताव प्रांताधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले. प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी प्राप्त प्रस्तावांची डीवायएसपींकडून चौकशी करून घेतली. यानंतर प्राप्त अहवालानुसार प्रांताधिकार्यांनी चारही हद्दपारीच्या प्रस्तावावर सुनावणी घेत संबंधितांना बाजू मांडण्याची संधी दिली. यानंतर मंगळवारी सायंकाळी भुसावळ शहरातील अनुक्रमे मुकेश प्रकाश भालेराव, प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी, शेख चॉँद शेख हमीद, अजय गिरधारी गोडाले यांच्या हद्दपारीचे आदेश निघाले.