भुसावळातील जय गणेश फाउंडेशनतर्फे 268 शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनाचे औचित्य : उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड : स्व.अरुण मांडळकरांच्या आठवणींना दिला उजाळा

भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे यंदा गणेशोत्सवात शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या स्मृती जपण्यासाठी गुरुगौरव सन्मान सोहळा घेण्यात आला. त्यात शहरातील 268 गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, शल्यचिकित्सक डॉ.सुरेंद्र भिरुड, जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, अध्यक्ष चैत्राम पवार हे उपस्थित होते.

गुन्हेगारीचा बिमोड होण्यासाठी पोलिस मित्र व्हावे
गणेशोत्सवाला जय गणेश फाउंडेशनने सामाजिक उपक्रमांची जी जोड दिली ती पथदर्शी आहे. अशाच समाजाभिमुख उपक्रमातून सकारात्मक विचार वाढीस लागतात. पर्यायाने नकारातमकतेचा सूर लोप पावतो. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नागरीकांनी पोलिस मित्र व्हावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले. सन्मानित केलेल्या शिक्षकांपैकी माजी प्राचार्य डॉ.जगदीशप्रसाद सूचिक, जगदीश शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानगंगेचे पाईक असलेल्या तीन पिढ्यांचा संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळतो आहे. खर्‍या अर्थाने सुसंस्कारीत समाजनिर्मितीचा उद्देश या गणेशोत्सवाच्या माध्यमातून साध्य होत असल्याची भावना त्यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केली. प्रत्येक शिक्षकाला गुरुगौरव सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन किरण सोहळे यांनी केले. यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

अरुण मांडळकरांनी पिढ्या घडवल्या
रोटरीचे माजी प्रांतपाल तथा जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक अरुण मांडळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा गुरुगौरव सन्मान सोहळा पार पडला. मांडळकर यांनी साधारणत: सशक्त अशा तीन पिढ्या घडवल्या. त्यांचा सहवास लाभलेले अनेक विद्यार्थी आजमितीला देश-विदेशात मोठ्या पदावंर काम करीत आहेत. मांडळकर हे आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत शहराच्या शैक्षणिक विकासासाठी झटले, अशी भावना सन्मानार्थी शिक्षकांनी प्रातिनिधीक स्वरुपात व्यक्त केली.