भुसावळातील ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाने समस्या सुटणार

0

भुसावळ : गेल्या अनेक वर्षांपासुन नगरपरीषद रुग्णालयात नागरीकांना कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने सततचा पाठपुरावा करून ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रूग्णालय मंजूर करून आणले होते. या दोन्ही इमारतींचे काम पुर्ण झाले असून या इमारती आरोग्य विभागाच्या ताब्यात दिल्या जाणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांसोबत इमारतीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

पाठपुरावा आला फळाला
यावेळी आमदार सावकारे म्हणाले की, संत गाडगेबाबा रुग्णालयात सुविधा नसल्याने गोरगरीब नागरीरकांना उपचारासाठी व पोलिस विभागाला आरोपींचे मेडीकल, शवविच्छेदन व विविध कामांसाठी जळगाव, यावल व वरणगाव येथे जावे लागत होते. बर्‍याचदा अनेक अपघात ग्रस्तांना उपचाराअभावी जीव गमवावे लागत होते. नव्याने तयार झालेल्या या दोन्ही रुग्णालयात पदे मंजूर आहेत मात्र डॉक्टर व अन्य कर्मचा-यांची भरती अद्याप झालेली नाही.सध्या कोरोनासाठी प्रशासनाने रेल्वे व आयुध निर्माणी रूग्णालय तसेच केंद्रीय विद्यालय अधिग्रहित केले असून शासकीय मालकीच्या या इमारतीही आता कामात येतील. लवकरच कर्मचारी भरती झाल्यावर परीसरातील नागरीकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा व पोलिस विभागाला त्रास कमी होणार आहे.सततचा पाठपुरावा फळाला आल्याचेही आमदार सावकारे यांनी सांगितले. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस.परदेशी, अभियंता एस.यु.कुरेशी आदी उपस्थित होते.