भुसावळातील तरुणाच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
भुसावळ सत्र न्यायालयाचा निकाल : जुन्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा शहरात झाला होता खून :
भुसावळ : जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील रहिवासी असलेल्या आनंद अशोक वाघमारे (28) या तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना 6 मे 2018 रोजी रात्री आठ वाजता पंचशील नगरात घडली होती. या प्रकरणी आरोपी प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आरोपीने खुनाचे गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने त्यास जन्मठेपेची शिक्षा न्या.आर.एम.जाधव यांनी सोमवार, 11 रोजी सुनावली.
जुन्या वादातून तरुणाचा झाला होता खून
पंचशील नगरात मार्च 2018 मध्ये संशयीत आरोपी प्रल्हाद सचदेवने अर्जुन गणेश वाघमारेला मारहाण केली होती तर यावेळी मृत आनंद वाघमारेने हा वाद सोडवल्याने तेव्हापासून संशयीत प्रल्हाद सचदेव मयत आनंद यास खुन्नस देत होता. रविवार, 6 मे 2018 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आनंद वाघमारे व त्याचा मित्र अफजल शरीफ पिंजारी हे कामावरून परत येत असताना पंचशील नगरातील दिलीप वसंत भालेराव यांच्या घरासमोर आरोपी प्रल्हादने तब्बल 11 वेळा पोटावर व पाठीवर चाकूचे वार केल्याने आनंदचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी मयताचा भाऊ चेतन वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी प्रल्हाद सचदेवविरुद्ध बाजारपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली होती.
गुन्ह्यात साक्ष ठरली महत्वाची
खुनाच्या गुन्ह्यात सरकार पक्षातर्फे एकूण 15 साक्षीदार तपासण्यात आले. मयाताचा भाऊ तथा फिर्यादी चेतन वाघमारे, हसन तडवी, प्रकाश गायकवाड, डॉ.एन.ए.देवराज यांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. न्या.आर.एम.जाधव यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर आरोपीस जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावली. दंड न भरल्यास एक महिने साध्या कारवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता प्रवीण पी.भोंबे यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक अंनिस शेख यांनी केलर तर पैरवी अधिकारी म्हणून सहा.फौजदार समीना तडवी तसेच केस वॉच म्हणून गयास शेख यांनी काम पाहिले.