भुसावळातील तिघा मित्रांसाठी बुलेटची रपेट ठरली काळ

0

अपघातांची मालिका ; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

भुसावळ- शहरातील जुने सातारा भागात रेल्वे सुरक्षा बलातील हवालदाराला ट्रकने चिरडल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास बुलेटवरून रपेट मारण्यास निघालेल्या तिघा मित्रांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अवघ्या 20 ते 25 वयोगटातील तरुणांवर बुलेटवरील रपेट काळ ठरल्यानेया घटनेने जाम मोहल्ला भागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघातानंतर ट्रक चालक पसार
नाहाटा चौफुलीकडून खडका चौफुलीकडे बुलेट (एम.एच.19 डीई 9146) ला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिवपूर-कन्हाळा फाट्यावर शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक वाहनासह पसार झाला तर बुलेटस्वार तिघा मित्रांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने शेख वाजीद शेख रफिक (22), शेख समीर शेख हमीद (24, दोघेही रा.जाम मोहल्ला) व शेख जावेद शेख मोहिनोद्दीन (22, रा.काझी प्लॉट) हे तीन तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस ट्रकसह चालकाचा शोध घेत आहेत.