भुसावळातील तीन दुकानदारांकडून 15 हजारांचा दंड वसुल

0

शहरात प्लॅस्टीक बंदीविरोधात पथक झाले सक्रीय

भुसावळ- राज्यात प्लॉस्टीक बंदीची घोषणा सरकारने 23 जूनपासून केल्यानंतर सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जात असताना भुसावळ पालिकेनेही कारवाईसाठी कंबर कसली आहे. पहिल्या दिवशी सोमवारी कुकरेजा सुपर मार्टवर कारवाई झाल्यानंतर मंगळवारी यावल रोडवरील शंकर प्रोव्हीजनचे संचालक अमित कुमार यांच्याकडून पाच हजारांचा दंड वसुल करण्यात आला होता तर बुधवारी दिवसभरात पालिकेच्या चार पथकाने तीन दुकानदारांकडून प्लॅस्टीकचे साहित्य जप्त करीत 15 हजारांचा दंड वसुल केला. जामनेर रोडवरील श्रीराम डेअरीचे संचालक विलास विश्‍वनाथ बोंडे यांच्याकडून 16 किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले तर वसंत टॉकीजमागील विलास जनरल स्टोअर्स तसेच बाजार वॉर्डातील अविनाश छाबडीया यांच्याकडून आठ किलो प्लॉस्टीक जप्त करून प्रत्येकी तिघांना पाच हजारांप्रमाणे 15 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

पालिकेच्या चार पथकांकडून कारवाई
पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्याधिकारी निवृत्ती पाटील, आरोग्य निरीक्षक प्रदीप पवार, आरोग्य निरीक्षक व्ही.सी.राठोड, पर्यवेक्षक सुरज युवराज नारखेडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.