भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवींना शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाने प्रस्ताव तयार करून ते प्रांताधिकार्यांकडे पाठवले होते. या प्रस्तावांवर अंतिम कामकाज झाल्यानंतर शहरातील दोन उपद्रवींना अनुक्रमे एक व दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या आदेशामुळे भुसावळातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गणेश रमेश कवडे (गमाडीया प्रेस, जुनी जीन, भुसावळ) यास एका वर्षांसाठी तर राहुल नामदेव कोळी (जुना सातारा, मरीमाता मंदिराजवळ भुसावळ) यास दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद आहे.
निवडणुकीपूर्वी आणखी काहींची हद्दपारी होणार !
आगामी काळात होणार्या पालिका निवडणुकांच्या अनुषंगानेदेखील पोलिस प्रशासनाने नियोजन केले असून त्याबाबत उपद्रवींसह संघटीत टोळ्या हद्दपार होण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. आणखी काही उपद्रवी हद्दपार होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गणेश कवडेविरोधात सात गुन्हे दाखल असून त्यात हाणामारी, प्राणघातक, हल्ला, शासकीय कामकाजात अडथळा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे तर राहुल कोळी विरोधात जबरी लूट व हाणामारीचे चार गुन्हे दाखल आहेत. भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात तत्कालीन शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्यांनी उपद्रवींना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केले होते.