भुसावळातील नाराज सत्ताधारी नगरसेवक खडसेंच्या ‘दरबारी’

0

पालिकेतील वाद श्रेष्ठींच्या कानावर : मुख्याधिकार्‍यांविषयी तक्रारी

भुसावळ :पालिकेचे नगराध्यक्ष व गटनेत्यांमध्ये शुक्रवारी विशेष सभा संपल्यानंतर झालेल्या वादानंतर भाजपाच्या अंतर्गत गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपासाठी ही बाब नुकसानकारक ठरणार असल्याने नाराज सत्ताधारी नगरसेवकांनी नगराध्यक्षांना डावलत आमदार संजय सावकारे यांच्या पक्ष कार्यालयात आमदारांच्या कानावर गार्‍हाणे टाकले तर पालिकेतील मुख्याधिकारी बिलांवर स्वाक्षर्‍या करीत नसल्याने त्यांच्या बदलीच्या मागणीसाठी पक्षश्रेष्ठी असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या कानावर दिवसभरातील घडामोडी टाकण्यात आल्या. भुसावळात भाजपात आता खडसे व सावकारे गट उघड समोर आल्याने नवीन राजकारणाची नांदी पोळ्यालाच फुटल्याचे दिसून आल्याने हा विषय शहरवासीयांसाठी चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री खडसेंच्या भेटीनंतर भाजपाचे नगरसेवक व आमदार संजय सावकारे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रात्रीच नांदेडला रवाना झाले तर शनिवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

नगराध्यक्षांविरोधात नगरसेवक एकवटले
सत्ताधारी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्याबाबत भाजपाच्याच नगरसेवकांच्या कुरबुरी आधीपासून सुरू होत्या मात्र उघडपणे कुणी बोलत नव्हते. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही युवराज लोणारींनी नगराध्यक्षांनाच अडचणीत आणत शहराच्या समस्या मांडल्याने येथून पहिल्या वादाची ठिणगी पडली तर शुक्रवारीदेखील गटनेता मुन्ना तेली व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या शाब्दीत वाद वाढल्याने दोघेही एकमेकावर धावून गेले. शहरात वादाची वार्ता पसरल्याने भाजपासाठी ही बाब डोकेदुखी ठरली. नाराज नगरसेवकांनी दुपारीच आमदार संजय सावकारे यांच्या कानावर पालिकेतील प्रकार टाकून नगराध्यक्षांच्या कृतीचा पाढा वाचला. त्यानंतर आठ ते दहा वाहनांद्वारे सर्व नगरसेवक खडसेंच्या फार्म हाऊसवर धडकले. यावेळीदेखील नगरसेवकांनी गार्‍हाणे मांडले. विशेष म्हणजे आमदारांच्या संपर्क कार्यालयात नाराज नगरसेवकांच्या बैठकीत नगराध्यक्ष नसल्याने सत्ताधार्‍यांमधील कलगीतुरा आगामी काळात कुठल्या वळणावर जातो? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

अखेर नगरसेवक नांदेडमध्ये धडकले
नूतन मुख्याधिकारी डहाळे कुठल्याही बिलांवर स्वाक्षर्‍या करीत नसल्याने सत्ताधारी कमालीचे दुखावल्याने मुख्याधिकारी हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भाजपेयी नांदेडकडे निघाले. शुक्रवारी रात्री खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांनी माजी मंत्री खडसेंशी चर्चा करीत व्यथा मांडल्यानंतर रात्रीच हे नगरसेवक नांदेडकडे निघाले तर शनिवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे समजते मात्र त्यास अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.