कारवाईदरम्यान अनेकांना कोसळले रडू ; रेल्वे सुरक्षा बलासह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागातील रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणार्या 161 घरांचे अतिक्रमण मंगळवार, 30 रोजी सकाळी सात वाजेपासून पोलिस बंदोबस्तात पाडण्यास सुरुवात झाली. कारवाईदरम्यान अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. 161 रहिवाशांना पोलिसांनी गुरूवारी तसेच शुक्रवारी नोटीस बजावली होती तसेच जागा तत्काळ रीकामी करण्याची सूचनाही केली होती. मंगळवार, 30 रोजी अतिक्रमण हटवण्यात येणार असल्यासंदर्भात रहिवाशांना कळवण्यात आल्याने कारवाईच्या आदल्या दिवशीच 119 अतिक्रमितांनी खाजगी वाहनाने आपले बिर्हाड अन्य स्थळी हलवले होते मात्र 42 कुटुंबांना पर्यायी जागा नसल्याने त्यांनी अतिक्रमित घरातच साहित्य ठेवले होते मात्र मंगळवारी सकाळी ताफा धडकताच अतिक्रमण धारकांची चांगलीच धावपळ उडाली व मिळेल त्या वाहनाने त्यांनी आपले बिर्हाड अन्यत्र हलवले.
पोलिस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त
मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी भेट दिली. प्रसंगी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार संजय तायडे घटनास्थळी थांबून होते. जळगाव मुख्यालयातून आलेल्या शंभर कर्मचार्यांसह तसेच आरसीपी प्लाटून व 30 महिला कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा सुरक्षा बलाचे यार्डमधील निरीक्षक डी.एच.पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षकांसह 70 कर्मचार्यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्यात आले.