भुसावळातील पती- पत्नीला डेंग्यूची लागण ; जळगावात उपचार

0

नगरपालिकेने केले 170 घरांचे सर्वेक्षण

भुसावळ- शहरातील सुरभीनगर भागातील कोठारी दांम्पत्याला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, दरम्यान पालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत सोमवारी सुरभीनगर व परिसरातील तब्बल 170 घरांतील 280 कंटेनरचे सर्वेक्षण केले. यात दहा कंटेनरमध्ये डेंग्यूच्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत.

दाम्पत्यावर जळगावात उपचार
शहरातील सुरभीनगर भागातील दिलीप मांगीलाल कोठारी (वय 60) व त्यांच्या पत्नी लता दिलीप कोठारी (वय 55) यांना शनिवारी प्लेटलेट कमी झाल्याने जळगाव येथील सिटी गोल्ड हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हे दांम्पत्य शुक्रवारपासून आजारी होते. शहरात कोठेही प्राथमिक उपचार न घेता त्यांनी थेट जळगाव येथील खासगी दवाखाना गाठला. याबाबतची माहिती सोमवारी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर व वैद्यकिय पथकाने सुरभी नगर व परिसरात भेट दिली. कोठारी यांच्या घराच्या परिसरातील 170 घरांतील 280 कंटेनरचे सर्वेक्षण करण्यात आले.

डासांच्या अळ्या आढळून आल्या
पालिकेेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात घरामध्ये पाच व बाहेर ठेवलेल्या पाच अशा दहा कंटेनरमध्ये डेंग्यूच्या एडिस इजिप्ती या डासाच्या अळ्या आढळून आल्या. डेंग्यूच्या अळ्या आढळून आलेल्या घरांसह अन्य घरांतील नागरीकांनाही आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान सण – उत्सवांच्या दरम्यानच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

पंधरा दिवसांनी केले जात सर्व्हेक्षण
पालिकेच्या माध्यमातून दर 15 दिवसांनी शहरात कंटेनर सर्वेक्षण केले जाते. झोपडपट्टी भागात कोठेही डेंग्यू फैलावासाठी कारणीभुत असलेल्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या आढळून आल्या नाहीत. या डासांची उत्पत्ती अंत्यत शुध्द पाण्यात होते. यामुळे शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणार्‍या भागात फैलाव होण्याचा धोका अधिक असतो. शहरात आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, साठविलेल्या विना वापराच्या पाण्यात अ‍ॅबेट टाकावे, टायर, कुंड्या, गच्चीवरील कुलरचे रिकामे भांड्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांनी केले आहे.