टाळ-मृदुंगाचा गजर करीत आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक
भुसावळ- शहरातील संस्कृती फाऊंडेशनतर्फे श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात पर्यावरणपूरक गणरायाची विधीवत स्थापना करण्यात आली होती. शुक्रवारी हभप जगन्नाथ महाराज अंजाळेकर वारकरी संस्थेतील वारकर्यांच्या उपस्थितीत दिंडी काढून विघ्नहर्त्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या वर्षांपासून संस्थेतर्फे पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना केली जात आहे. श्रींच्या आरतीनंतर आमदर संजय सावकारे, रजनी संजय सावकारे व नगरसेवक युवराज लोणारी यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान ते पंचमुखी हनुमान मंदिर, महाराणा प्रताप चौकापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प.धनराज महाराज, अंजाळेकर व भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला. संस्कृती फौंडेशनने वेगवेगळे आदर्श उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून पर्यावरण संवर्धनाचे व पर्यावरणाला प्रदूषणमुक्त ठेवण्याचे कार्य अलौकिक असल्याची भावना आमदारांनी प्रसंगी व्यक्त केली.
महाराणा प्रताप चौकात बाप्पांचे विसर्जन
महाराणा प्रताप चौकात शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन नगराध्यक्ष रमण भोळे व सदस्यांच्या हस्ते करण्यात ओ. पर्यावरण पूरक गणरायाची स्थापन करून त्याचे विसर्जन कृत्रिम कुंडात करण्यात आले. शहरात नवीन संदेश ही युवा पिढी घेऊन येत आहे आणि ह्यांचा इतरांनीदेखील आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष रमण भोळे ह्यांनी प्रसंगी केले.
यांनी घेतले परीश्रम
उत्सव यशस्वितेसाठी रणजीतसिंग राजपूत, तुषार गोसावी, शुभम तायडे, जोस्त्ना झारखंडे, अजय पाटील, सावन चौहान, पवन कोळी, संस्कार मालविया, हर्षवर्धन बाविस्कर, हर्षल येवले, चेतन गायकवाड, शुभम पाटील, अजित गायकवाड, निकिता फालक, नम्रता चांडक, पूजा पाटील, गायत्री पाटील, गायत्री चौधरी, सोनू कोळी, रुपाली चौधरी आदींनी परीश्रम घेतले.
निर्माल्य संकलनामुळे नवव्या दिवशी विसर्जन
गणेशोत्सव हा 10 दिवसाचा असतो परंतु आम्ही सर्वजण गणेशोत्सवा च्या शेवटच्या दिवशी नदीपात्रात निर्माल्य संकलनाचे कार्य करीत असल्यानेच नवव्या दिवशी विघ्नहर्त्याचे विसर्जन केले जाते, असे संस्थाध्यक्ष रणजितसिंग राजपूत म्हणाले. गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न असून दरवर्षी नदीपात्राची श्रमदानातून स्वच्छता करतो व यंदादेखील गणेश विसर्जनाच्या दुसर्या दिवशी सकाळी सात वाजेपासून तापी पात्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे त्यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.