भुसावळातील पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी

0

तिघांविरुद्ध गुन्हा : तलवारीच्या धाकावर खटला मागे घेण्याची मागणी

भुसावळ- न्यायालयातील खटला काढून टाकावा अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी देत भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती राजेंद्र नाटकर यांना तलवारीच्या धाक दाखवल्याप्रकरणी तीन संशयीतांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा समिती सभापती राजेंद्र नाटकर (रा. सुतार गल्ली, भुसावळ) यांच्या घरात मंगळवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हर्षल उर्फ छन्या दत्तू राणे (श्री नगर, रींग रोड, भुसावळ), नवाब लाल मोहंमद गवळी (रा.गवळी वाडा, भुसावळ) व भरत मधुकर महाजन (रा. सिध्दी विनायक पार्क, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) यांनी बेकायदा प्रवेश करीत नाटकर यांना तलवार व लोखंडी रॉड लावत धमकी दिली. चहावाला योगेश यांच्या पत्नीने नवाब गवळी यांच्या विरूध्द दाखल केलेला खटला न्यायालयातून मागे घ्यावा, अन्यथा नाटकर वा त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचा संशयीत खून करतील, अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप नाटकर यांनी फिर्यादीत केला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साहील तडवी तपास करीत आहे.