भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्या दहा दिवसापासून पाणीपुरवठा ठप्प

0

नगरसेविका मीनाक्षी धांडे यांच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा ः नागरीकांना दिलासा

भुसावळ- शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून होणार्‍या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये दहा तब्बल दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. यामुळे प्रभागातील नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे आपल्या प्रभागातील नागरीकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरीकांना दिलासा मिळत आहे.

पावसाळ्यात टंचाईच्या झळा
शहरात पाणीपुरवठा करणार्‍या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन कोलमडले आहे. परीणामी शहराच्या विविध प्रभागात सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांवर पावसाळ्याच्या दिवसातही कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे तसेच होणारा पाणीपुरवठा गढूळ स्वरूपाचा होेत असल्याने शहरवासीयांना पालिकेकडून गढूळ पाण्याची शिक्षा मिळत असल्याची भावना व्यक्त करीत नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये तर तब्बल दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरीकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. याची दखल घेवून प्रभागातील नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांनी पदरमोड करीत आपल्या प्रभागात तीन दिवसापासुन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे गंगाराम प्लॉट, कोलते गल्ली आदी भागातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

पाणी जारची मागणी कायम
पावसाळा सुरू होताच पाण्याच्या जारची मागणी कमी होते. यंदा मात्र शहरवासीयांना अनियमीत व गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील पाण्याच्या जारची मागणी उन्हाळ्याप्रमाणे कायम असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मात्र शहरवासीयांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शहरवासीयांचे अमृत पेयजल योजनेच्या कामाकडे लक्ष लागले आहे.