भुसावळातील प.क.कोटेचा महाविद्यालयात प्राचार्य व कर्मचार्‍यांमध्ये वाद

0

पोलीस ठाण्यात समजुतीनंतर पडला वादावर पडदा

भुसावळ- शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयातील लॅब असिस्टंटन नितीन मुरलीधर पाटील यांच्या कर्जाच्या अर्जावर प्राचार्या मंगला साबद्रा यांनी स्वाक्षरी न केल्याने उभयंतांमध्ये मंगळवारी चांगलाच वाद रंगला तर या प्रकरणी पाटील यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठत प्राचार्यांविरूध्द तक्रार देण्याची तयारी दर्शविल्याने शहर व तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. मंगळवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांच्या समजुतीनंतर वादावर पडदा
शहर पोलिस ठाण्यात शिक्षण क्षेत्रातील वाद आल्यामुळे पोलिसांनी प्राचार्या मंगला साबद्रा यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेत दोन्ही जणांना ही तुमची अंतर्गत बाब असून शिक्षण विभागाकडे अथवा विद्यापीठाकडे आपण तक्रार करावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे काहीही करू नये, असे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांनी बजावले. कर्ज अर्जावर स्वाक्षरी करणे हा महाविद्यालयातील भाग आहे, त्यासाठी भारतीय दंड विधानात काहीही तरतूद नाही, विद्यापीठाअंतर्गत हा वाद असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस ठाण्याच्या बाहेर महाविद्यालयातील कर्मचारी गोळा झाले होते. याप्रसंगी अनिल जैन, सायरा नाहाटा, यतीन ढाके यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला.