प्रशासनाने दखल घेण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांची मागणी
भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्यातरी नागरीक मात्र घराबाहेर पडत असून पोलिसांकडून आता वाहनधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहनेही जप्त केली जात आहेत तर दुसरीकडे शहरातील विविध बँकांमध्ये पेन्शन घेण्यासाठी तसेच विविध कामांसाठी नागरीकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केली आहे.
शिवसैनिकांचे सोशल डिस्टन्सवर मार्गदर्शन
शुक्रवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सर्वच बँकांत गर्दी झाली. पेंशन घेणार्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असल्याने कोरोनामुळे ज्येष्ठ नागरीकांना त्रास होऊ शकतो. गर्दी करणार्या नागरीकांना शहर प्रमुख बबलू बर्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, पवन नाले, युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील, गणेश पाटील यांनी सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. सेंट्रल बँक मॅनेजर सोबत चर्चा करून पेंशनसाठी एक ऐवजी चार काउंटर सुरू करायला सांगितले आहे. बँकेची वेळ 11 ते 2 पेक्षा जास्त करून द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बॅकांसाठी जिल्हाधिकार्यांनी स्वतंत्र निर्बंध लागू केले असून त्याअंतर्गत एकावेळी बॅकेत चार ते पाच ग्राहकांनाच प्रवेश द्यावा तसेच काऊंटरसमोर देखील ठराविक अंतरातच ग्राहक राहतील असे निर्देश आहेत मात्र त्यानंतर देखील अनेक बॅँका आणि एटीएम सेवा देताना काळजी घेत नसल्याचे दिसून आले.
शहरात नियम धाब्यावर
बँका आणि एटीएममध्ये देखील सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक ग्राहक किमान पाच फुटांचे सामायीक अंतर ठेवून बँकमध्ये व एटीएम बाहेर मार्किंग करावे, बँक एटीएमसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांना हँड ग्लोज वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रत्येक बँक आणि एटीएम मध्ये प्रवेश करताना बँकेमार्फत सँनिटायझर उपलब्ध करून द्यावे, रांगेतील प्रत्येक व्यक्तीच्या हातावर सँनिटायझर टाकल्यानंतर त्याने हात स्वच्छ केल्यानंतरच बँकेत अथवा एटीएम येथे प्रवेशास परवानगी द्यावी, ज्या बँक व एटीएममध्ये जास्त गर्दी होते अशा बँकांनी बँकेबाहेर गर्दी नियंत्रणासाठी बँकेच्या व्यवस्थापनाने पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत. तसेच या नियोजनानुसार बँकांनी कामाचे तास व बँक बंद अथवा चालू ठेवण्याची वेळ याबाबत नियोजन करावे तसेच आपत्कालीन परीस्थिती असल्यामुळे उलटपक्षी त्यांनी जास्तीत जास्त वेळ बँक एटीएम उघडे ठेवून नागरीकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे नियमच आहे पण हे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील बँकांमध्ये व्यवहार सुरू असल्याने प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे.