भुसावळातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्‍यांचे पोलिसांनी नोंदवले जबाब

0

भुसावळ । शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून चोरट्यांनी दोन लाख 13 हजारांची रोकड कॅशियरच्या कॅबीनमधून लांबवण्याची घटना गत मंगळवारी भर दिवसा घडली होती. या पद्धत्तीनेच अकोला भागात चोरी झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून आंध्रातील टोळीने हे कृत्य केले तेथे केल्यानंतर भुसावळात केल्याचा प्राथमिक संशय आहे. या प्रकारात बँकेच्या कॅशियरचा हलगर्जीपणा उघड झाला असून शनिवारी बँकेच्या मॅनेजरसह सर्व कर्मचार्‍यांचे बाजारपेठ पोलिसांनी जाबजवाब नोंदवले. मंगळवारी दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास कॅशियर राजेंद्र शंकरराव पगारे (57, बंब कॉलनी, भुसावळ) यांना अज्ञात व्यक्तीने बोलण्यात गुंग ठेवून अज्ञात आरोपीने कॅशियरच्या कॅबिनमध्ये शिरत ड्रावरमधून रोकड लांबवली होती. बाजारपेठ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पाच सीसीटीव्ही कॅमेरे असलेतरी त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने चोरट्यांची स्पष्ट छबी कैद झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. बँक प्रशासनाने उच्च दर्जाचे कॅमेरे बसवावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.