भुसावळ- तालुक्यातील कुर्हेपानाचे ते गोजोरा रस्त्यावरील काळ्या ऑईलपासून बेकायदा बायोडिझेल बनवण्याच्या कारखान्यावर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 8 रोजी धाड टाकत लाखोंच्या मशनरीसह टँकर आदी साहित्य जप्त केले होते तर दोन चालकासह क्लीनरला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य संशयीत असलेल्या फॅक्टरी मालकासह मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश घुले यांना अटक करण्यात चार दिवसानंतरही पोलिसांना यश आलेले नाही. राज्यभरात या बनावट डिझेलची पाळेमुळे फोफावली असल्याने आरोपींची अटक गरजेची असून त्यानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे.
अन्य संशयीतांना कोठडी
पोलिस उपअधीक्षक कार्यालयाजवळून जाणाीसर टाटा सुमो (क्रमांक एम.एच.19 वाय.5303) मधून 360 लिटर डिझेलची बेकायदा वाहतूक होत असताना शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले तसेच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार आदींच्या पथकाने सुमो चालक संजय दगा पाटील (भास्कर नगर, पाचोरा) यास ताब्यात घेतले होते. पोलिस चौकशीत आरोपीने हे डिझेल शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्समधील मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश घुले यांच्या सांगण्यावरून कुर्हेपानाचे ते नशिराबाद दरम्यान असलेल्या गोजोरे रस्त्यावरील संदेश फॅक्टरीतून आणायचे सांगितल्याची कबुली दिल्यानंतर पोलिस पथकाने सापळा रचत संदेश एनर्जीस फॅक्टरीत शुक्रवार, 8 रोजी दुपारी छापा टाकून कंपनीच्या आवारातील लोखंडी पाच टाक्यांमध्येे मॉशरॉईजर ऑईल, लाईट डिझेल ऑईल व खराब ऑईलने भरलेल्या 200 लिटरने भरलेल्या टाक्या तसेच पॅरालायझेस नावाची मशीन व लाईट डिझेल भरलेला टँकर (क्रमांक एम.एच.04 एफ.पी.4650) जप्त केला होता. या प्रकरणी फिरोजखान मोहमदखान (रजा नगर, भुसावळ) व मोहमदखान तुरखा खान (मुस्लिम कॉलनी, भुसावळ), टाटा सुमो चालक संजय दगा पाटील (पाचोरा) यांना अटक करण्यात आली होती तर मनीष ट्रॅव्हल्सचे मालक सतीश भिका घुले (भुसावळ) यांच्यासह फॅक्टरी मालक संदेश सुरेश अग्रवाल (रा.पाचोरा, जि.जळगाव) हे गुन्हा घडल्यापासून पसार आहेत. दरम्यान, अटकेतील आरोपींना न्यायालयाने 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्यांना न्यायाहजर केल्यानंतर सरकार पक्षातर्फे गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केल्यानंतर संशयीतांना 15 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.