भुसावळातील महालक्ष्मी ट्रस्टतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश

0

आमदार संजय सावकारे यांनी केले पदाधिकार्‍यांचे कौतुक ; उद्या दोन हजार दिव्यांची रोषणाई मंदिर परीसरात होणार

भुसावळ- शहरातील खडका रोड भागातील प्रसिद्ध महालक्ष्मी माता मंदिरात बुधवारी भुसावळचे आमदार संजय सावकारे व रजनी सावकारे यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. 56 भोग दाखविण्यात आले तर गुरुवारी, 8 नोव्हेंबर रोजी दोन हजार दिव्यांची रोषणाई मंदिर परिसरात करण्यात येणार आहे, असे महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी कळवले आहे.

महालक्ष्मी ट्रस्टतर्फे प्रदूषण मुक्त दिवाळीचा संदेश
सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहणार्‍या महालक्ष्मी ट्रस्ट तर्फे यंदा प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश देण्यात आला आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणाचा स्तरही वाढतच जातो. यामुळे घशाचे आणि फुप्फुसाचे आजार वाढतात, वृद्धांना ध्वनी आणि वायुपदूषणाचा भयंकर त्रास होतो, लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वात उपस्थितांनी घेतला. दिवाळी म्हणजे दीपोत्सव, दिव्यांचा सण, पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, आनंदाचे उधाण, जुने मतभेद हेवेदावे विसरून एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, नातेवाईक, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण आहे, असे अनिल पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.

आमदार संजय सावकारे यांच्याकडून ट्रस्ट पदाधिकार्‍यांचे कौतुक
वृक्षारोपण ते वृक्षसंवर्धनाचे काम ट्रस्ट मोठ्या आनंदाने करते. सामाजिकतेचा भान ठेवत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारापासून गरीब होतकरू लोकांना मदत करणे, वाचन संस्कृती रुजू करण्यासाठीचा वाचनालयाचा उपक्रम, असे अनेक उपक्रम महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून निरंतर सुरू आहेत. ज्येष्ठ व तरुण पदाधिकारी हेच ट्रस्टचे विविध कार्यक्रम निस्वार्थपणे सफल करतात, असे गौरवोद्गार आमदार संजय सावकारे यांनी काढले. प्रसंगी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष सुरेश बर्‍हाटे, सचिव मनोहर बर्‍हाटे, प्रा.धिरज पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, लीलाधर भारंबे, मधुकर लोखंडे, दिलीप बर्‍हाटे, सोपान पाटील, रवींद्र पाटील, किशोर पाटील, दीपक झांबरे, जितेंद्र भारंबे, संदीप लोखंडे, दीपक बर्‍हाटे, लतेश भारंबे, संजय बर्‍हाटे, धर्मराज देवकर आदी उपस्थित होते.