भुसावळ : भुसावळातील पालिका कर्मचार्यावर उपचार करणार्या व सिंधी कॉलनीत दवाखाना असलेल्या 42 वर्षीय डॉक्टरांना कोरोनाची बाधा असल्याचे शनिवारी निष्पन्न झाल्याने भुसावळात खळबळ उडाली होती. जामनेर रोडवरील महेश नगरात डॉक्टरांचे वास्तव्य असल्याने हा भाग रविवारी पालिका प्रशासनाकडून सील केला जाणार आहे. दरम्यान, शनिवारी शहरातील पंचशील नगरातील 55 वर्षीय महिलादेखील कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आल्यानंतर पालिका प्रशासनातर्फे शनिवारी या भागात आरोग्य सर्वेक्षण तसेच सॅनिटायझजेशन करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.
महेश नगरासह सिंधी कॉलनीचा काही भाग सील होणार
शहरातील समता नगर, पंचशील नगर, डॉ.आंबेडकर नगर या भागात प्रत्येकी एक तर जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी भागात यापूर्वी दोन बाधीत रुग्ण आढळल्यानंतर शांती नगर भागातील एकाच कुटुंबातील डॉक्टर, त्यांची पत्नी व मुलालादेखील कोरोनाची लागण झाल्याने बाधीतांची संख्या आठवर पोहोचली असतानाच शनिवारी पुन्हा पंचशील नगरातील महिलेसह जामनेर रोडवरील सिंधी कॉलनीतील डॉक्टरांचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरातील कोरोना बाधीतांची आता दहावर पोहोचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. पंचशील नगराचा परीसर यापूर्वीच प्रशासनाने सील केला आहे तर सिंधी कॉलनीत दवाखाना असलेल्या डॉक्टरांचा रहिवास महेश नगरात असल्याने रविवारी हा परीसर सील करण्यात येणार आहे तसेच सिंधी कॉलनीचा परीसर सील असलातरी आणखीन काही भाग मंगळवारी सील करण्यात येणार आहे. शनिवारी पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे, डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी या परीसराची पाहणी केली.
संपर्कात आलेल्यांना कोविड केअर सेंटरमध्ये कॉरंटाईन करणार
रुग्ण आढळलेल्या परीसरात पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे आशा वर्कर्स, नर्सेस तसेच डॉक्टरांकडून सर्वेक्षण केले जात आहे. शनिवारी आढळलेल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना डॉ.आंबेडकर वस्तीगृहात कॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली.
भुसावळात 650 बेडचे नियोजन
शहरातील डॉ.आंबेडकर वस्तीगृहात कोरोना संशयीत रुग्णांना कॉरंटाईन केले जात असून लवकरच शहरातील नवोदय विद्यालयात 200 बेडची व्यवस्था केली जाणार आहे शिवाय शहरात एकूण 650 रुग्णांची कॉरंटाईन व्यवस्था करता येईल, या दृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू असल्याचे मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या.