श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रीक्षा चालकांसह दुचाकी धारकांना दिलासा
भुसावळ- शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या ट्रीमीक्स कामाचा शुभारंभ गत महिन्यात रविवार, 5 ऑगस्ट रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते भूमिपूजनाने झाला होता. तब्बल 57 वर्षांनी रस्त्याचे भाग्य उजळल्याने शहरवासीयांसह वाहन धारकांनी समाधान व्यक्त केले होते. तब्बल 48 दिवसांपासून रस्त्याचे ट्रीमीक्स पद्धत्तीने काम सुरू असून रविवार, 23 रोजी श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. भोळे म्हणाले की, गणेश भक्तांची गैरसोय होवू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच काम पूर्ण झाल्याने दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. गणेश भक्तांसाठी या रस्त्यावर एलईडी दिवे लावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी केवळ दुचाकींसह रीक्षांची वाहतूक होणार खुली
नगराध्यक्ष भोळे म्हणाले की, रविवारी केवळ रीक्षा, दुचाकी व पादचार्यांसाठी वाहतूक खुली केली जाणार असून लवकरच बसेस व अन्य वाहनांसाठी वाहतूक खुली करण्यात येणार आहे. ट्रीमीक्स पद्धत्तीच्या कामामुळे किमान 40 वर्ष या रस्त्यावर डांबरीकरण राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रवाशांना मिळणार दिलासा : दहा रुपयांचा अतिरीक्त भूर्दंड कमी होणार
यावल, रावेर तालुक्यातून येणार्या-जाणार्या एसटी महामंडळाच्या बसेस गवळीवाडा आणि मामाजी टॉकीज मार्गाऐवजी नाहाटा महाविद्यालय, महामार्ग, कोणार्क हॉस्पिटलकडून तब्बल 6.9 किलोमीटर फेर्याने प्रवासी वाहतूक करीत असल्याने प्रवाशांचा 20 मिनिटांचा वेळ वाया जातो शिवाय 10 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड प्रवास भाड्यापोटी सहन करावा लागतो. हा रस्ता खुला झाल्यास हा अतिरीक्त भूर्दंड कमी होणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळण्याची आशा आहे. पालिकेने शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याचे काम 5 ऑगस्टपासून सुरू केले. परिणामी या मार्गावरुन यावल, फैजपूर, सावदा, रावेरकडे जाणारी एसटीची वाहतूक बसस्थानक, जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीज, मामाजी टॉकीज रोडमार्गे जळगाव रोडवर ऐवजी पांडुरंग टॉकीजपासून पुढे नाहाटा चौफुली, राष्ट्रीय महामार्ग, कोणार्क हॉस्पिटल, जुने सतारे व गांधी पुतळा या मार्गाने वळवण्यात आली. यामुळे 6.9 किलोमीटर अंतराचा फेरा पडत असला तरी महामंडळाने सुरुवातीचे 15 दिवस भाडेवाढ केली नाही. मात्र, या दरम्यान इंधन दर वाढल्याने गत आठवड्यापासून एसटीने 6.9 किमीचा फेरा पाहता यावल, फैजपूर, सावदा, रावेर व चोपड्याकडे जाणार्या बसेसचे भाडे 10 रुपयांनी वाढवले आहे.