कर्मचार्यांची धावपळ ; तातडीने मिळवले आगीवर नियंत्रण
भुसावळ- शहरातील मॉडर्न रोडवरील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या जनरेटर संचाला सोमवारी दुपारी अचानक आग लागल्याने कर्मचार्यांची तसेच पोस्टात आलेल्या ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठल्याने काहीशी पळापळही झाली मात्र कर्मचार्यांनी सतर्कता दाखवत तातडीने अग्निरोधक सिलिंडरचा वापर केल्याने मोठी हानी टळली तर या आगीमुळे जनरेटर संच पूर्णपणे जळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज
मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारातच सुमारे दिड लाख रुपये किंमतीचा जनरेटर संच ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी 1.10 वाजेच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होताच जनरेटर चालू करण्यात आला मात्र सोमवारी शहराचे तापमान आधीच 48 अंशावर पोहोचले असतानाच अचानक जनरेटरमधून स्पार्किंग झाल्यानंतर आग लागली व त्यासोबतच धुराळे लोळ बाहेर पडू लागल्याने विविध कामे घेवून पोस्टात आलेल्या ग्राहकांची धावपळ उडाली. यावेळी सतर्क कर्मचार्यांनी पोस्टात बसवण्यात आलेल्या अग्निरोधक सिलिंडरचा वापर करीत तातडीने जनरेटरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तर पालिकेच्या अग्निशमन दलालादेखील पाचारण करण्यात आल्यानंतर या बंबांने आगीवर नियंत्रण मिळवले.
पर्यायी व्यवस्था करणार -बी.बी.सेलूकर
वाढत्या तापमानामुळे काहीशी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने बहुधा जनरेटर पेटला असावा. सुदैवाने कुणालाही ईजा झालेली नाही मात्र जनरेटरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तंत्रज्ञाला बोलावल्यानंतर नेमकी आगीचे कारण कळू शकणार आहे. पोस्टातील कामांवर त्यामुळे कुठलाही परीणाम झालेला नसून लवकरच वीज गेल्यानंतर कामांवर प्रभाव न पडण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येईल, असे मुख्य डाकघर अधीक्षक बी.बी.सेलूकर म्हणाले.