भुसावळातील यावल रस्ता निकृष्ट कामामुळे सोसतोय घाव

Bad condition of Yawal road in Bhusawal for half a year due to shoddy work भुसावळ : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भुसावळ-यावल रस्त्याचे मार्च-एप्रिल 2021 मध्ये डांबरीकरण करण्यात आले होते. त्यासाठी अर्थसंकल्पीय निधीतून एक कोटी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्याची वाट लागल्यानंतर त्यावेळी दुरुस्ती करण्यात आली मात्र अलिकडेच झालेल्या पावसाने पुन्हा रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाल्याने निकृष्ट रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

रस्त्यावर सर्वदूर पडले खड्डे
शहरातील वर्दळीच्या यावल रोडची स्थिती अत्यंत बिकट झाल्याने आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केल्यानंतर अर्थसंकल्पीय निधीतून एक कोटी 10 लाखांचा निधी मंजूर होता रस्त्याचे काम मार्च – एप्रिल 2021 मध्ये करण्यात आले. यावल रोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील यावल रस्त्यापासून तापी नदीपर्यंतच्या एकूण दोन हजार 300 मीटर रस्त्याचे काम ठेकेदाराकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात त्यावेळी रस्ता उखडल्याने ओरड होताच पॅचवर्क करण्यात आले तर अलिकडे झालेल्या पावसाळ्यात पुन्हा रस्त्याची ‘जैसे थे’ अवस्था झाल्याने वाहनधारक संतप्त झाले आहेत.

सप्टेंबरमध्येही पॅचवर्क झाले होते
मार्च 2021 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले, मात्र अवघ्या सहा महिन्यांत पहिल्याच पावसानंतर रस्त्याची स्थिती बिकट झाल्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सप्टेंबर 2021 मध्ये महात्मा गांधी पुतळ्यासमोरील भाग, साईजीवन सुपर शॉप परीसर, सेँट अ‍ॅलायसेस शाळेजवळ असलेल्या खड्ड्यांची डागडूजी करण्यात आली.

आता काँक्रिटीकरणाची अपेक्षा
यावल रोडच्या डांबरीकरण कामासाठी दोन-तीन वर्षांनी या रस्त्याच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. या मार्गावर अजवड वाहतूक अधिक असते मात्र रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होत नसल्याने लाखोंच्या निधीचा चुराडा होतो. अवजड वाहतूकीच्या निकषांनुसार रस्ता होत नसल्याने तो अल्पावधीत खराब होतो. यामुळे आता डांबरीकरणाऐवजी या मार्गाचे काँक्रीटीकरण व्हावे, अशी अपेक्षा आहे.

ठेकेदार व ‘सार्वजनिक बांधकाम’चे साटेलोटे
यावल रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धत्तीने करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याने रस्त्याची दुरुस्ती होत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार संजय सावकारे यांनी दिली. या रस्त्याच्या कामासाठी विरोधकांनी आंदोलनही केले मात्र आता ते विरोधक काम जाब विचारत नाहीत? असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला.