आमदार संजय सावकारेंची प्रशासनाशी चर्चा ; रेल्वेकडील बेघरांची यादीचे तहसील प्रशासनाच्या अवलोकनानंतर जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी जाणार
भुसावळ- सुमारे तीन पिढ्यांपेक्षा अधिक काळापासून रहिवासी असलेल्या रेल्वे परीसरातील अतिक्रमीत झोपडपट्टीधारकांच्या घरांवर रेल्वे प्रशासनाने हातोडा टाकल्याने बेघर झालेल्या कुटूंबियांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले आहे तर दुसरीकडे 24 तासांचा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला अल्टीमेटम सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी दिला असतानाच मंगळवारी सायंकाळी भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी पुर्नवसनाच्या प्रश्नावर शासकीय विश्रामगृहात बैठक घेवून चर्चा केली. यावल रस्त्यावरील राहुल नगरामागील प्रशस्त जागेचा पर्याय अतिक्रमितांच्या पुर्नवसनासाठी सूचवण्यात आला असून आमदारांनी स्थानिक प्रशासनासह नगराध्यक्ष व जिल्हाधिकार्यांशी या संदर्भात चर्चादेखील केली. तहसील प्रशासन रेल्वेकडून तसेच पोलिसांनी घरे पाडण्यात आलेल्या अतिक्रमितांची यादी मागवणार असून तिच्या अवलोकनानंतर ती जिल्हाधिकार्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
अतिक्रमितांचा प्रश्न सुटण्याची आशा
गेल्या 48 तासांपासून अतिक्रमित बांधव पुर्नवसनाच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत तर सोमवारी चाळीस बंगला भागातील रहिवासी संतोष लक्ष्मण सावळे (वय 37) याने अचानक प्रवेश करून अंगावर रॉकेलची कॅन ओतल्याने गोंधळही निर्माण झाला होता. सुदैवाने अनर्थ टळला असलातरी गरीबांवर झालेल्या अन्यायाची चीडदेखील या निमित्ताने समोर आल्याने प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची अपेक्षा आता व्यक्त होत आहे. आमदार सावकारे यांनी मंगळवारी दुपारी नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, राजू सूर्यवंशी, रमेश मकासरे, सुदाम सोनवणे, विनोद सोनवणे, मनोहर अहिरे, बाळा पवार आदींच्या उपस्थितीत बैठक घेवून पुनर्वसनाच्या विषयावर चर्चा केली. राहुल नगरामागील जागेचा पर्याय सूचवण्यात आला आहे. तत्पूर्वी ज्यांचे अतिक्रमण काढण्यात आले अशांची यादी तहसील प्रशासन पोलिस व रेल्वे प्रशासनाकडून मागवून प्रस्ताव तयार करणार आहे व या प्रस्तावाला अंतिम मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी देणार आहेत. दरम्यान, नियोजित जागेवर 21 नोव्हेंबरपासून जागेचे सपाटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती असून जागा सपाटीकरण करण्याच्या नावाखाली झोपडपट्टीधारकांनी कोणालाही पैसे देऊ नये, असे आवाहन राजू सूर्यवंशी यांनी केले आहे.
निर्णयाविना उपोषण मागे न घेण्याचा निर्धार
दरम्यान, रेल्वेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत बेघर झालेल्या कुटूंबियांच्या पुर्नवसनासाठी प्रशासनाने सरकारी भुखंडामध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून निर्णयाविना उपोषण मागे न घेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बेघर कुटूंबियांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी या मागणी करावी, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली. मागण्या मान्य न झाल्यास सामुहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. शुभम सोयंके, उमेश चाबुकस्वार, संदीप सपकाळे, गणेश सपकाळे, विशाल सपकाळे, मथुरा पवार, सारीका भालेराव, विक्की मेश्राम, विश्वास पवार, इम्रान खान आदींसह बेघर नागरिक या उपोषणात सहभागी झाले आहेत.
पुर्नवसनासाठी राहुल नगरातील जागेचा पर्याय -आमदार
मंगळवारी अतिक्रमण धारकांच्या पुर्नवसनासाठी स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली. राहुल नगरामागील प्रशस्त जागा पर्याय असून त्यासाठी स्थानिक तहसील प्रशासन प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे पाठवतील. आपण या संदर्भात जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून असून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. ही जागा शासकीय भूखंडाची असल्याने पालिकेकडून सोयी-सुविधा पुरवण्याबाबतही नगराध्यक्षांशी चर्चा केली व त्यांनी त्या संदर्भात आश्वासनही दिले असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर सुविधा -नगराध्यक्ष
28 रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत रेल्वे हद्दीतील काढण्यात आलेल्या अतिक्रमणाची माहिती शासनाला कळवणे व मार्गदर्शन घेण्याबाबत ठराव करून तो प्रशासनाला पाठवण्यात येईल शिवाय जिल्हाधिकार्यांनी आदेश दिल्यानंतर नियोजित जागेवर पालिका सोयी-सुविधा पुरवेल, असे नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले. अल्पसंख्यांक व जनविकास कार्यक्रमांतर्गत तयारी करून अतिक्रमितांच्या पुर्नवसनाबाबत दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.