भुसावळ- स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत भुसावळ पालिकेने शौचालयांची दुरवस्था थांबवण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. प्रभाग क्रमांक सातमधील महिला शौचालयाचा लूक बदलून हे शौचालय शहरात रोल मॉडेलही ठरले होते मात्र कालांतराने समाजातील अपप्रवृत्तींनी या शौचालयाच्या पाण्याची पाईप लाईनसह टाईल्सचे नुकसान केले तर नळदेखील चोरून नेण्यात आले तसेच लाईटही लांबवण्यात आले. हे कमी होते की काय म्हणूनदरवाज्याची तोडफोड करून काहींनी दरवाजे लांबवले. शौचालयात पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोअरींगदेखील करण्यात आली तर गुरुवारी चोरट्यांनी दिडशे फूट खोल सबमर्सीबल पंप तसेच वायरची देखील चोरी केली. या प्रकारानंतर प्रभाग क्रमांक सातमधील नगरसेवक मुकेश पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे तर मुख्याधिकार्यांनी आरोग्य निरीक्षक निवृत्ती पाटील यांना दोषींवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहेत. दरम्यान, नगरसेवक मुकेश पाटील म्हणाले की, नागरीकांसाठी अधिकाधिक सुविधा दिल्या मात्र काही उपद्रवींनी पंप चोरून नेल्याने अन्य महिलांची गैरसोय झाली आहे. पालिकेकडे या संदर्भात तक्रार करण्यात आली असून अपप्रवृत्तींचा शोध घेवून पालिका मालमत्तांची नासधूस करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्याधिकार्यांना केली आहे.