भुसावळातील वीज कंपनीची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासंदर्भात आज उर्जामंत्री घेणार निर्णय

0

भुसावळ : शहरातील महावितरण कंपनीची चार विविध कार्यालये असून ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. सर्व कार्यालये भाडेतत्वावर घेतली असल्याने शासनाला दरमहा भाडेपट्टीचा भुर्दंड व नागरीकांना वेगवेगळ्या कार्यालयात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांना पत्रव्यवहार केला आहे.
शहरात महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कार्यालय, शहर विभाग सहाय्यक अभियंता कार्यालय, सहाय्यक अभियंता ग्रामिण विभाग कार्यालय, शहर विभाग झोन दोन कार्यालय आदी चार कार्यालये चार भाड्याच्या इमारतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. यामुळे दरमहा भाडेपोटी शासनाला भुर्दंड सहन करावा लागतो. ही सर्व कार्यालये एकाच इमारतीमध्ये असल्यास शासनाने भाडेपोटी जाणारी रक्कम वाचेल व महावितरणला हक्काची इमारत तयार होईल. यासह नागरिकांना एकाच ठिकाणी कार्यालय नसल्याने धावपळ करावी लागते. यामुळे महावितरण कंपनीचे सर्व चारही कार्यालय एकाच जागी असावेत, याबाबत आमदार संजय सावकारे यांनी उर्जामंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. याबाबत उर्जामंत्र्यांनी दालनात बैठक घ्यावी, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

नागपूरात आज बैठक
आमदार संजय सावकारे यांनी दिलेल्या पत्रानुसार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूर येथे बैठक होणार आहे. या बैठकीला उर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहे. या बैठकीत महावितरणच्या कार्यालयांसाठी स्वतंत्र इमारतीबाबत चर्चा होईल.