भुसावळातील शासकीय गोदामात गोर-गरीबांच्या स्वस्त धान्यावर डल्ला

0

भुसावळ (गणेश वाघ) : कोरोनामुळे जागतिक जंकट ओढवले असताना गोर-गरीबांसाठी शासनाकडून मोफत तसेच अल्प दरात धान्य दिले जात असताना भुसावळातील शासकीय गोदामातून मात्र क्विंटलमागे तीन ते चार किलो धान्य कमी दिले जात असल्याचा प्रकार जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी शनिवारी तालुक्यातील वांजोळा गावात उघडकीस आणला आहे. अशाच पद्धत्तीने प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदाराला कमी धान्य दिले जात असल्याने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी सावकारे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील रेशन घोटाळा काही महिन्यांपूर्वी राज्यभर गाजला होता तर अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या त्यावेळी होवून प्रशासकीय कारवायादेखील झाल्या होत्या मात्र आता पुन्हा घोटाळ्यांचा आरोप झाल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चौकशी करणार : तहसीलदार
स्वस्त धान्य दुकानदारास नियतनानुसार स्वस्त धान्य देण्याचे आदेश आहेत, कुणालाही कमी धान्य देण्याच्या सूचना नाहीत मात्र असा काही प्रकार होत असल्यास निश्‍चित चौकशी केली जाईल, असे तहसीलदार दीपक धीवरे म्हणाले.

वांजोळ्यात उघड आला धक्कादायक प्रकार
मतदारसंघातील ग्रामस्थांना स्वस्त धान्य मिळत आहे वा नाही? याची चौकशी करण्यासाठी जि.प.सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे स्वतः वांजोळ्यातील दुकानावर थांबून होत्या. यावेळी सावकारे यांनी भुसावळातील गोदामातून आलेल्या धान्याचे वजन केले असता प्रत्येक कट्ट्यामागे दिड ते दोन किलो धान्य कमी आढळल्याने त्यांनी संबंधित स्वस्त धान्य दुकानदारास विचारणा केली असता त्यांनी भुसावळातील गोदामातूनच धान्य कमी येत असल्याचे सांगितले तर गोडावून किपरदेखील शासनाचे आदेश असल्याची बतावणी करीत असल्याने शासन असा आदेश कसा देऊ शकते? असा प्रश्‍न सावकारे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, तालुक्यातील इतर स्वस्त धान्य दुकानदाराकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे सुद्धा अशाच प्रकारे क्विंटल मागे तीन ते चार किलो तांदूळ कमी आल्याचे सांगण्यात आले.

240 क्विंटल धान्याचा साठा गेला कुठे ?
सरासरी एका क्विंटलमागे तीन ते चार क्विंटल धान्याची घट पकडली तर तालुक्यात सुमारे सात ते आठ हजार क्विंटल केवळ तांदुळ प्राप्त झाला असून त्यातील 240 क्विंटल तांदूळ गेला कुठे ? असा प्रश्‍न आहे. त्याशिवाय गहू, डाळ अशा इतर धान्यामध्ये किती मोठा घोटाळा झाला असावा? असा प्रश्‍न उपस्थित करीतया प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दरम्यान, वांजोळा येथे ग्रामसेवक आनंद सुरवाडे, तलाठी विनोद बारी, सरपंच देविदास सावळे, पोलिस पाटील संतोष कोळी, माजी सरपंच नरेंद्र पाटील, अ‍ॅड. हरीश पाटील, भागवत मोरे, स्वस्त धान्य दुकानदार जगदीश दोडे, गणेश कोळी उपस्थित होते.

कुणीही लाभार्थी वंचित राहू नये -पल्लवी सावकारे
स्वस्त धान्य वाटप करताना त्याचा लाभ पात्र लाभार्थींनाच व्हावा यासाठी स्वतः खबरदारी बाळगत मी स्वस्त धान्य दुकानावर उपस्थित होते मात्र दुकानदारालाच कमी धान्य मिळाल्याने मोठा धक्का बसला तसेच हा प्रकार अन्य दुकानदारांच्या बाबतीत झाल्याने आपण जिल्हाधिकार्‍यांकडे या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे जि.प.सदस्य पल्लवी सावकारे यांनी सांगितले.