भुसावळातील शासकीय गोदामात धान्याचा मोठा घोटाळा
प्रहार पक्षातील पदाधिकार्यांचा भुसावळातील पत्रकार परीषदेत आरोप
भुसावळ : शहरातील शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या जाणार्या 50 किलोंच्या कट्ट्यामागे दोन ते तीन किलो धान्य कमी प्रमाणात दिले जात असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू आहे. या प्रकारामागे शासकीय अधिकार्यांसह राजकीय पदाधिकार्यांचा सहभाग असून प्रहार संघटना आता याबाबत पुढाकार घेवून सुरूवातीला हमालांविरोधात गुन्हा दाखल करेल व त्यानंतर पोलिस चौकशीत प्रकारामागील शक्ती उजेडात येतील, असा दावा प्रहार अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष फिरोज शेख यांनी शासकीय विश्रामगृहात बुधवारी आयोजित पत्रकार परीषदेत केला.
गरीबांचा घास हिरावला
शहरातील शासकीय धान्य गोदामातून दररोज मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले जाते मात्र 50 किलोंच्या कट्ट्यातून दोन ते तीन किलो धान्य हमाल बांधव काढत असून हा प्रकार कुणाच्या आशीर्वादाने व आदेशाने होत आहे याची चौकशी आता होणे गरजेचे आहे. या प्रकारामागे काही राजकीय पदाधिकार्यांचा हात असल्याचा संशय असून प्रहार संघटना आता सुरूवातीला हमालांविरोधात गुन्हा दाखल करीत असून पोलिस चौकशीत नेमका प्रकार समोर आहे शिवाय दोषी अधिकार्यांवर कारवाईची मागणी आम्ही करणार असल्याचे फिरोज शेख म्हणाले. या संदर्भात जिल्हाधिकारी व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी धान्यात होत असलेल्या घोटाळ्याचा व्हिडिओही पत्रपरीषदेत सादर केला. मंत्री बच्चू कडू यांच्या दौर्यानंतर त्यांच्यावर टिका सुरू असलीतरी प्रहारचे उद्दीष्ट केवळ सेवा हेच असल्याचे ते म्हणाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जाम मोहल्ला व आगाखान वाडा भागातील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने त्याबाबतही त्यांनी पालिकेवर टिकेची झोड उठवली. मोहम्मद नगरातील एका जागेवर पालिका आरक्षणाचा घाट घालत असून त्यास नागरीकांचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
जागेवरील आरक्षण हटवण्यासाठी आर्थिक देवाण
प्रहार संघटनेचे कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष केदार सानप म्हणाले की, पालिका जागेवरील आरक्षण हटवण्यासाठी मुख्याधिकार्यांनी सध्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण सुरू केली आहे मात्र प्रहार संघटना ही बाब खपवून घेणार नाही. सर्वे क्रमांक 67/68,1+5 व 68/2 या जागेवरील आरक्षण हटवण्यात आले असून मुख्याधिकार्यांनी 21 एप्रिल रोजी विधी अधिकारी भाऊसाहेब देशमुख यांना दिलेल्या पत्रात पालिकेची आर्थिक परीस्थिती जागा संपादीत करण्यासारखी नाही, असे नमूद केले आहे मात्र माहिती अधिकारात मी संंबंधित माहिती मागितली असता मुख्याधिकार्यांनी 24 मे रोजी पुन्हा विधी अधिकार्यांना पत्र देवून 31 मे पूर्वी पुर्नविचार याचिका दाखल करण्याचे सूचवले मात्र विधी अधिकार्यांनी मुख्याधिकार्यांना याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्याचे कळवले आहे. हा प्रकार म्हणजे निव्वळ भुसावळकरांची फसवणूक करण्याचा असून प्रहार हे खपवून घेणार नाही, मुख्याधिकार्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल न केल्यास प्रहार संघटना भुसावळकरांतर्फे स्वतःहून याचिका दाखल करेल, असेही केदार सानप म्हणाले.
यांची होती उपस्थिती
प्रहार शहराध्यक्ष प्रकाश (खन्ना) कोळी, प्रसिद्धी प्रमुख भूषण जेठवे, अल्पसंख्यांक उपाध्यक्ष कलिम शेख आदींची उपस्थिती होती.