भुसावळ : अन्न सुरक्षा यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नागरीकांनी अर्ज सादर केले असून ऑनलाईन प्रणाली मार्फत लवकरात-लवकर उपाययोजना कराव्यात यासाठी शुक्रवारी तहसील कार्यालयात पुरवठा विभागात शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी श्रीनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, भिरुड कॉलनी, कोळी वाडा, भोई नगर, हुडको कॉलनी परीसरातील दिनेश खैरनार, प्रशांत तावडे, दिलीप झांबरे, कमल चत्रत, ललित किरंगे, हर्षल पाटील, कैलास तावडे, सुरेश पाटील, संदीप अहिरे, गोकुळ चौधरी, वत्सला बाई पाटील, सुभाष वारके, शंकर झांबरे, खुशाल किरंगे, शामराव कोळी यांचे अर्ज दाखल केले आहे.
रेशनिंग कार्ड नसलेल्यांना धान्य द्यावे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी कायदा लागू करण्यात आल्याने दैनंदिन व्यवस्था काहीशी डळमळत झाली आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जिकिरीचे प्रयत्न करीत असताना या कालावधीमध्ये उदरनिर्वाहसाठी रेशनिंगधारकांसह रेशनिंग कार्ड नसलेल्यांनाही शिधा उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा गोर-गरीबांकडूनही व्यक्त होत आहे. ही अपेक्षा रास्त असल्याचे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.
शिधापत्रिका नसलेल्या नागरीकांना धान्य द्यावे -प्रा.धीरज पाटील
राज्यभरात शिधापत्रिकेच्या आधारावर शासकीय धान्य व शिधा दिला जातो परंतु सद्यस्थितीमध्ये यामध्ये काही अंशी बदल करून अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट नसलेल्या व शिधापत्रिका नसणार्या गरजवंताला धान्य व शिधा उपलब्ध करून देणे ही शासनाची नैतीक जबाबदारी आहे. शिधापत्रिका नसलेल्या गरजू व्यक्तींचे आधार कार्ड, मजूर म्हणून शासकीय, निमशासकीय व अशासकीय नोंदीचा पुरावा, ग्राह्य धरून संबंधित गरजूंना धान्य वाटप करण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अन्नधान्य वितरण मंत्री छगन भुजबळ, जळगाव जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन, भुसावळ पुरवठा अधिकारी सुभाष तायडे यांना देण्यात आल्याचे शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी सांगितले.
ग्राहकांनी ई केवायसी दुकानदाराकडे करावी
रेशन दुकानदाराला दिलेल्या मशीन मध्येच ई केवायसी होते. ज्या ग्राहकांचे ई केवायसी धान्य मिळत नसल्यास दुकानदाराकडूनच ई केवायसी करून घ्यावी, दुकानदाराने नकार दिल्यास ग्राहकांनी पुरवठा विभागात माहिती द्यावी, असे पुरवठा अधिकारी सुभाष तायडे यांनी सांगितले आहे.