कॅम्पस इंटरव्ह्यूत मिळाली संधी ; अभ्यासक्रम पूर्ण होण्याआधीच दिलासा
भुसावळ (प्रतिनिधी)- श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम विभागातील विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून सरप्राईज भेट मिळाली. सात मोठ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या दिवशी ’कॅम्पस इंटरव्ह्यू’ घेत 41 विद्यार्थ्यांची निवड केली. त्यापैकी तीन कंपनीनी गुरुवारी ऑफर लेटर दिले. अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम शिकत असणार्या या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच नोकरीची संधी प्राप्त झाली आहे.
तोंडी मुलाखतीद्वारे झाली निवड
ब्रम्हासर टेक्नोलॉजी, मुंबई, सलेक्ट कंट्रोल, मुंबई, धूत ट्रान्समिशन, औरंगाबाद या कंपन्यांनी महाविद्यालयात ’कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले होते. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉमच्या बी.टेक आणि एम.टेक. (अंतिम वर्ष) अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. विषयाचे ज्ञान, संभाषण कौशल्य, तोंडी मुलाखतीद्वारे निवड झाली. गुरुवारी या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डॉ.राहुल बारजिभे, डॉ.गिरीश कुलकर्णी, प्रा.सचिन देशमुख, प्रा.धिरज पाटील, कंपनीचे संचालक व पदाधिकारी यांच्या हस्ते ऑफर लेटर दिले.