रास्ता रोकोनंतर पालिका प्रशासनाने घेतली दखल
भुसावळ– शहरातील सिंधी कॉलनीत तब्बल नऊ दिवसानंतरही पाणी न आल्याने पुरूष व महिला रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर येत रास्ता रोको केला होता. पाण्यासाठी संतप्त रणरागिनी रस्त्यावर उतरल्याने सत्ताधारी भाजपाच्या गोटात खळबळ उडाली होती. आंदोलनाची दखल घेत मंगळवारी पहाटे या भागात पाणीपुरवठा करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी रहिवाशांनी केले आहे.
अनेक भागात अद्यापही हाल
शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा झाला नसल्याने अद्यापही नागरीकांचे हाल कायम आहेत. पाणीपुरवठा करणार्या पंपाने एअर पकडल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 24 मध्ये रात्री-बेरात्री पाणीपुरवठा होत असल्याने दिवसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी व्यक्त केली.