भुसावळातील हंबर्डीकर चौकाने घेतला प्रथमच मोकळा श्‍वास

0

शहर वाहतूक शाखेसह पालिका प्रशासनाची धडक मोहिम ; अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाईची टाच

भुसावळ- शहरातील सर्वाधिक कोंडी होणार्‍या हंबर्डीकर चौकात शहर वाहतूक शाखा व पालिका प्रशासनाने गुरुवारी अतिक्रमण करणार्‍या धडक कारवाई केल्याने लोटगाडी चालकांसह रस्त्यावर साहित्य ठेवणार्‍या विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे लोखंडी पुल ते यावल रोडवरील साईजीवन सुपर शॉपदरम्यानच्या रस्त्यावर लावण्यात येणार्‍या लोटगाडी तसेच अतिक्रमण करणार्‍यांना पहिल्या दिवशी प्रशासनाने तंबी दिली तसेच तीन गाड्यांसह चार स्टुल, आठ खुर्चीसह दोन दुकानाबाहेर ठेवलेले फलकही जप्त करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच या चौकाने मोकळा श्‍वास घेतल्याने सुज्ञ नागरीकांनी समाधान व्यक्त केले.

कारवाईने अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांसह पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने सकाळी 11 वाजेपासून कारवाईचा धडाका सुुरू केला. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करून उभ्या राहात असलेल्या हातगाड्या, दुकानदाराचे दुकानाचे फलक, दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेले साहित्य, दुकानाच्या बाहेर लावलेले फट जप्ती सुरू केल्यानंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. सुरुवातीला केवळ पथकाकडून समज देण्यात येईल या गैरसमजात असलेल्या विक्रेत्यांनी प्रत्यक्षात साहित्य जमा करण्यास सुरुवात करताच विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. हंबर्डीकरच चौकात बाहेरगावहून येऊन भाजीपाला विक्री करणार्‍यांना सुध्दा पोलिसांनी तेथून हटविले. तसेच भाजीची थाटलेली दुकाने, फळ विक्रेते यांचे दुकाने तेथून काढायला लावली. पोलिसांनी प्रत्येक दुकानदारांना सूचना करीत दुकानाच्या बाहेर लावलेली वाहने हटविण्यास सांगितले. वारंवार सूचना देण्याची वेळ येऊ नये, अशी समज देण्यात आली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणे दुकाने थाटून वाहतूकीला अडथळा निर्माण करणार्‍यांना समज दिली. वसंत टॉकीजच्या अलिकडे असलेल्या चहाच्या दुकानाजवळ दुकानदारांचे फलक व सायकल बाहेर ठेऊन रस्ता वाहतूकीसाठी अडवित असल्याची तक्रार असल्याने त्यांनाही समज देऊन फलक व सायकल पुन्हा रस्त्यावर लावल्यास जप्त करण्याचा इशारा दिला आहे.

बेवारस साहित्य पथकाकडून जप्त
पोलिस व पालिकेकडून होत असलेल्या कारवाईत रस्त्यावर लावून ठेवण्यात आलेल्या हातगाड्या आणि विक्रत्यांंच्या खुर्ची, स्टुल याला कोणीही वारस नसल्याने पोलिसांच्या सूचनेवरून पालिका कर्मचार्‍यांनी जप्त केल्यात. यात गांधी पुतळ्या समोरील मार्गावरून खुर्ची, स्टुल, पाववड्याच्या हातगाड्या ताब्यात घेण्यात आल्या. पथकाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. यामुळे यावल रोडवरील विक्रेत्यांनी त्यांच्या हातगाड्या रस्त्यावरून हटवल्या.

आता रस्त्यावर अतिक्रमण केल्यास थेट गुन्हे
दुकानदार तसेच विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकान थाटून रस्ता अडवल्यास त्यांच्यावर पोलिस प्रशासनातर्फे गुन्हे दाखल केले जातील, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले म्हणाले. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व बेशिस्तपणे वाहने लावल्यास त्यांच्यावरही खटले दाखल करण्यात येतील, असेही गंधाले म्हणाले.