भुसावळातील हत्याकांड प्रकरण : आरोपी अरबाज खानला 9 पर्यंत पोलिस कोठडी
भुसावळ सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : नाशिकमधून केली अटक
भुसावळ : राज्यभर गाजलेल्या भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक स्व.रवींद्र खरात हत्याकांडातील पाचवा संशयीत आरोपी अरबाज अजगर खान ऊर्फ गोलू खान यास नाशिक रोड पोलिसांनी शुक्रवारी सकाळी नाशिक रोड भागातून ताब्यात घेतले होते. संशयीताला प्रचंड बंदोबस्तात भुसावळात मध्यरात्री आणण्यात आल्यानंतर दुसर्या दिवशी शनिवार, 5 रोजी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीला न्यायालयात आणण्यापूर्वी न्यायालयाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
अडीच वर्षानंतर आरोपी जाळ्यात
भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक स्व.रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यासह पाच जणांची रविवार, 6 सप्टेंबर 2019 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी चार संशयीतांना पकडण्यात पोलिस प्रशासनाला यश आले होते तर पाचवा संशयीत अरबाज खान हा मात्र पसार झाला होता. संशयीत नाशिकमध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक रोड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी सकाळी त्यास ताब्यात घेण्यात आले होते. बंदोबस्तात संशयीताला भुसावळात आणल्यानंतर शनिवारी रात्री 12. 53 वाजता भुसावळ शहर पोलिसांनी अटक केली.
प्रचंड बंदोबस्तात केले हजर
संशयीत अरबाज खान यास शनिवारी पोलिसांच्या सशस्त्र बंदोबस्तात भुसावळ अतिरीक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट यांच्यासह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संशयीत खानचे वकील अॅड.फिरोज शेख यांनी बाजू मांडतांना सांगितले की, घटना घडल्यावर संशयीत फक्त तेथे गेला होता, त्याचा काहीही सहभाग नाही, त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात यावी तर तपासाधिकारी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी संशयीत अरबाज हा घटनेपासून पसार असल्याने त्याने कोणत्या वाहनाचा उपयोग केला, यातील अटक केलेल्या संशयीतांना त्याने आठ कॉल केले असून एक मेसेज सुध्दा केला आहे. यामुळे संशयीतांची माहिती काढण्यासाठी सहा दिवसाची पोलिस कोठडी मिळण्याची मागणी केली. सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.मोहन देशपांडे यांनी युक्तीवाद करतांना सांगितले की, घटना गंभीर असून तपासासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याबाबत बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने ती मान्य करीत न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.