शिवसेनेच्या पदाधिकार्यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन ; हॉकर्सवर बंदी कायम, कारवाई होणार -पोलिस प्रशासन
भुसावळ- शहरातील अतिक्रमित व्यावसायिकांना पालिका प्रशासनाने आधी पर्यायी जागा द्यावी याबाबत शिवसेना पदाधिकार्यांनी शनिवारी निवेदनाद्वारे मुख्याधिकार्यांना साकडे घातले. पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हातगाडी व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. यामुळे शेकडो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर अनेक सुशिक्षित तरूण बेरोजगार होत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनानेच व्यावसायीकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून व्यावसायिकांच्या रोजगाराचे साधन हिरावले जाणार नाही. कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आजारपण अशा अनेक संकटांचा व्यावसायीकांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेप्रमाणे भुसावळ पालिकेने हातगाडी व्यावसायिकांसाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. पालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेला उत्पन्नाचे साधन मिळेल, असे निवेदनात नमूद केले. शिवसेनेचे शहर प्रमुख नीलेश महाजन, समाधान महाजन, बबलू बर्हाटे, योगेश बागूल, राकेश खरारे, गुणवंत पाटील, स्वप्नील सावळे, किरण भोई यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हॉकर्सवर बंदी कायम; पोलिसांनी स्पष्ट केली भूमिका
शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय हॉकर्स सेनेचे अध्यक्ष राजेंद्र सपकाळे व 300 हॉकर्स विक्रेत्यांनी प्रांताधिकारी डॉ. चिंचकर यांची भेट घेऊन दुकाने लावू देण्याची परवागनी मिळवली. दुपारी चार वाजेनंतर काही विक्रेत्यांनी दुकाने लावल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरु केली. यामुळे हॉकर्स बांधवांनी प्रांताधिकारी डॉ. चिंचकर यांची भेट घेत गर्हाणे मांडले. डीवायएसपी गजानन राठोड व बाजारपेठचे निरीक्षक देविदास पवार यांनी प्रमुख मार्गांवर रस्ता अडवून होणारे व्यवसाय बंद केले जातील, अशी भूतमका मांडली. यावर आता राष्ट्रीय हॉकर्स सेनेने किमान दिवाळीपर्यंत व्यवसायाला मुभा द्यावी, असे सांगितले मात्र प्रशासनाने मागणी मान्य केली नाही. यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, उपोषणाचा इशारा राष्ट्रीय हॉकर्स सेनेने दिला आहे.