भुसावळातील 12 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीस

भुसावळ : औरंगाबाद येथील मनसेच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. 4 तारखेपर्यंत प्रार्थनास्थळांवरील भोेंगे उतरले नाहीत तर तुम्हीही हनुमान चालिसा लावा, असा निर्वाणीचा इशारा औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी दिल्यानंतर पोलिस प्रशासनाने राज ठाकरे यांच्यासह पदाधिकार्‍यांविरोधात औरंगाबाद येथे गुन्हा दाखल केला आहे मात्र आगामी सण-उत्सवाचे दिवस पाहता व शहराची एकात्मता व शांतता कायम राखण्यासाठी भुसावळातील पोलिस प्रशासनाने स्थानिक 12 मनसे पदाधिकार्‍यांना भादंवि 149 अन्वये नोटीस बजावून घोषणाबाजी वा आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

23 ते 7 मे दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू
मनसे शहराध्यक्ष विनोद पाठक यांच्यासह शहरातील स्थानिक प्रमुख पदाधिकार्‍यांना भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघाण यांनी भादंवि 149 अन्वये नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू केले असून निर्बंध लागू केल्याने या आदेशाचे पालन करावे तसेच 3 रोजी प्रार्थनास्थळांसमोर भोंगे/लाऊड स्पीकर लावू नयेत व मिश्र वस्तीत परस्परविरोधी घोषणाबाजी, आंदोलनात्मक कार्यक्रम, समाज माध्यमातून संदेश प्रसारीत करू नये व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे त्यात बजावण्यात आले आहे. मनसे पदाधिकार्‍यांच्या कृत्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

मनसे पदाधिकार्‍यांची घेतली तातडीने बैठक
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी मंगळवारी रात्री डीवायएसपी कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. शांतता कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.