भुसावळातील 40 जणांना केले कॉरंटाईन

0

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील एका 58 वर्षीय महिलेसह सिंधी कॉलनीतील 21 वर्षीय तसेच भजे गल्लीतील 35 वर्षीय पुरूषाचा अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आल्यानंतर भुसावळात खळबळ उडाली होती. आरोग्य प्रशासनाने तीनही बाधीतांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 40 नातेवाईकांना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये कॉरंटाईन केले आहे. दरम्यान, येथे आता दाखल रुग्णांची संख्या सुमारे 51 झाली आहे. नगरपालिका प्रशासनातर्फे रुग्ण आढळलेल्या परीसरात मंगळवारी रात्री उशिरा सॅनिटायजेशन करण्यात आले तर बुधवारी दिवसभरात हा परीसर सील करण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता.

भुसावळात रुग्णसंख्या पोहोचली 15 वर
शहरातील समतानगर, शांतीनगर, पंचशीलनगर, सिंधी कॉलनी, महेशनगर पाठोपाठ मंगळवारी खडकारोड, भजे गल्ली भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. खडका रोड भागातील 58 वर्षीय महिला, भजे गल्लीतील 35 वर्षीय पुरूषासह सिंधी कॉलनीतील 21 वर्षीय युवक असे तिघांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले असतानाच बुधवारीदेखील गंगाराम प्लॉट भागातील 52 वर्षीय पुरूषासह खडका रोडवरील एका डॉक्टरांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. शहरात आतापर्यंत 15 रुग्ण कोरोनाने बाधीत झाले असून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. दरम्यान, खडकारोड भागात यापूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता मात्र मंगळवारी प्रथमच या परीसरात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य आणि पोलिस यंत्रणेने मंगळवारी सायंकाळीच प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड आदींनी परीसरात धाव घेऊन उपाययोजना राबवल्या.

पालिकेकडून ‘तो’ भाग सील करण्याची प्रक्रिया
मंगळवारी सिंधी कॉलनीतील 21 वर्षीय बाधीत रुग्ण हा यापूर्वी पॉझीटीव्ह आढळलेल्या रुग्णाचा नातेवाईक असून यापूर्वीच पालिकेने सिंधी कॉलनीचा परीसर सील केला आहे तर भजे गल्लीतील 35 वर्षीय पुरूषासह खडका रोड भागातील 58 वर्षीय महिला राहत असलेला परीसर पालिकेकडून बुधवारी सील करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.