भुसावळ- शहरातील गंगाराम प्लॉट भागातील 55 वर्षीय अविवाहित महिलेचा इलेक्ट्रीक पोलवरील विद्युत तारेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. नलुबाई बाबूराव नाफडे (55) असे मृत महिलेचे नाव आहे. सर्वसाधारण कुटुंबातील रहिवासी असलेल्या ही महिला आपल्या दोन भाऊ व तीन बहिणींसह राहत होती. घराजवळ ही महिला कचरा टाकण्यासाठी गेली असता विद्युत कुंपणात विद्युत खांबांवरील वायर तुटून वीज प्रवाह या महिलेच्या लक्षात येण्यापूर्वीच ती ओढली येऊन जागीच गतप्राण झाली. याबाबत माहिती मिळताच नगरसेविका मीनाक्षी धांडे व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे यांनी वीज कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्यांना याबाबत कल्पना दिली. अधिकार्यांनी तातडीने विद्युत पुरवठा खंडित करीत विजेची जोडणी केली. नाफडे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिल्याने याबाबत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.