भुसावळातून बहिण-भावाची एकाचवेळी निघाली अंत्ययात्रा

जामनेरजवळील अपघाताने भुसावळातील लग्न घरी पसरली शोककळा : भीषण अपघातात तीन जणांचा झाला मृत्यू

भुसावळ : लहान भावाचे लग्न असल्याने थोरल्या भावाने लग्नाची सर्व तयारी केली होती…. घरात नवी नवरी येणार म्हणून घरही सजले होते तर घरात दिराणी येणार म्हणून वहिनीही नटल्या-थटल्या होत्या…. सारा सैंदाणे परीवार लग्नाच्या तयारीत गर्क होवून स्वप्ने रंगवत असताना जामनेरजवळ झालेल्या भीषण अपघातात होत्याचे नव्हते झाले. नवरदेवाच्या मोठ्या भावासह चुलत बहिणीचा व पार्लरचालक विवाहितेचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नव्या नवरीच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेल्या मंडपात स्वागताऐवजी बहिण-भावाची शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्ययात्रा निघाल्याने उपस्थितांचे दुःखद प्रसंग पाहून डोळे पाणावले. अवघ्या दहा महिने वय असलेला स्पंदन पितृप्रेमाला पारखा झाला तर भावाच्या अपघाती निधनाने नवरदेवासह नवरीवरही मोठा मानसिक आघात झाला.

तर अपघात टळला असता
भुसावळातील तुकाराम नगरात वीज कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी गोविंदा सैंदाणे हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. मोठा मुलगा पंकज हा जयपूर येथे अकाऊटंट तर लहान मुलगा राजन हा पुण्यात अभियंता म्हणून कार्यरत आहे. मुळचा अमळनेरचा असलेला सैंदाणे परीवार गेल्या काही वर्षांपासून भुसावळातच स्थायीक झाला होता. शुक्रवार, 24 रोजी औरंगाबाद शहरातील जुन्या जकात नाक्यासमोरील मथुरा लॉन्समध्ये राजनचा विवाह हर्षदा नितीन बोरसे (रा.नंदुरबार, ह.मु.औरंगाबाद) या तरुणीशी निश्चित होता तर गुरुवारी सायंकाळी हळद समारंभ असल्याने सकाळीच वर्‍हाडी चार वाहनातून रवाना झाले मात्र जामनेरजवळ अज्ञात ट्रकने इंडिगो वाहनाला दिलेल्या धडकेत नवरदेवाच्या मोठ्या भावासह अन्य तिघे ठार झाल्याने लग्नघरी शोककळा पसरली. गुरुवारी सकाळी नवरदेव इनोव्हाने तर अन्य वर्‍हाडी दोन लक्झरी वाहनाने रवाना झाले तर नवरदेवाचा मोठा भाऊ, पत्नीसह अन्य तिघांना घेवून स्वतःच्या वाहनाने निघाला मात्र लग्नासाठीचे नवे कपडे घरीच राहिल्याने पुन्हा माघारी परतला व पुन्हा औरंगाबादकडे निघाला असताना क्रुर काळाने झडप घातली जर पुन्हा गाडी माघारी वळली नसती तर कदाचित ही घटना टळू शकली नाही.

वाढदिवसानंतर गाठले मृत्यूने
मयत पंकज यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने कुटुंबियांनी तो जल्लोषात साजरा केला मात्र वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशी अपघातरूपी कु्रर काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. पंकज हे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नेहमीच मित्रांना परदेशात जाण्याचे स्वप्न असल्याचे सांगत व त्यासाठी त्यांनी पासपोर्टही काढला होता मात्र परदेशात जाण्याचे स्वप्न हे स्वप्नच ठरले.

एकाचवेळी निघाली भाऊ-बहिणीची अंत्ययात्रा
भीषण अपघातात ठार झालेल्या पंकज सैंदाणे यांच्यासह नात्याने चुलत बहिण असलेल्या प्रतिभा जगदीश सैंदाणे (30, मूळ रा.अमळनेर) यांची गुरुवारी सायंकाळी उशिरा शहरातील तुकाराम नगरातून एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. या अपघातात सुखरूप बचावलेला दहा महिन्यांचा स्पंदन हा पितृ प्रेमाला पारखा झाल्याने अनेकांना गहिवरून आलेले दिसले. मयत पंकज यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परीवार आहे तर प्रतिभा सैंदाणे यांच्या पश्चात आई, दोन बहिणी तर पार्लर चालक मयत विवाहिता सुजाता हिवरे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परीवार आहे.

जिल्ह्यात अपघात कायम : वेग मर्यादा गरजेची
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुसाट वेगांमुळे अपघातांची मालिका वाढली आहे. आधीच रस्त्यांच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने संतापाची भावना असतानाच भरधाव वाहनांच्या वेगावरही आता कुणाचे नियंत्रण नसल्याने त्याबाबतही आश्चर्य व्यक्त होताना दिसते. गेल्या दिड महिन्यांपासून एस.टी.चा संप सुरू असून जिल्ह्यात अवैध वाहतूक फोफावल्यानेही अपघात वाढले आहेत. मंगळवार, 21 रोजी जामनेरजवळ लाकूड वाहतूक करणार्‍या 407 वाहनाने अ‍ॅपे रीक्षाला धडक दिल्याने तीन प्रवासी जागीच ठार झाल्याची घटना घडली तर पुन्हा तीन दिवसाने अर्थात गुरूवारी अपघात होवून तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. दीपनगरजवळदेखील कामगाराचा बुधवारी रात्री अपघाती मृत्यू झाला तर मंगळवारी पहाटे राजस्थान मार्बलजवळ ट्रक व डंपरमध्ये धडक होवून दोघे चालकही ठार झाले. या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी वेग मर्यादचे नियम आणखीन कडक करून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जवाबदारी आता आरटीओ व पोलिस प्रशासनाची आहे.

अपघातानंतर अनेकांची धाव
भुसावळातील कुटुंबाचा जामनेरजवळ अपघात झाल्याची माहिती कळताच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, सुमित बर्‍हाटे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांच्यासह तुकाराम नगरातील रहिवाशांनी धाव घेत मदत कार्य केले.