भुसावळातून विठ्ठल नामाच्या गजरात विशेष रेल्वे गाडी पंढरपूरकडे रवाना

1

हजारो वारकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग ः खासदार रक्षा खडसेंनी दाखवली हिरवी झेंडी

भुसावळ- श्री विठ्ठल नामाचा गजर करीत विठ्ठल भेटीची आस लागलेले हजारो वारकरी रविवारी सकाळी भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडीने रवाना झाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे व रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने आषाढीसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

विठ्ठल नामाने जंक्शन दुमदुमले
रविवारी सकाळी 9.45 वाजता नियोजित विशेष गाडी सुटणार होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे 10.45 वाजता एक तास उशिराने गाडी पंढरपूराकडे रवाना झाली. तत्पूर्वी केला सायडींगकडून विठ्ठल नामाच्या गजरात टाळ-मृदुंगाचा गजर करीत दिंडी काढण्यात आली. रेल्वे स्थानकावर दिंडी पोहोचल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे व अन्य लोकप्रतिनिधींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाडीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

भाविकांना फराळाचे वाटप
भुसावळ विभागातून पंढरपूर जाण्यासाठी आलेल्या हजारावर भाविकांना खासदार रक्षा खडसे यांच्यातर्फे केळी व केळी वेफर्सचे प्रसंगी वाटप करण्यात आले. खासदार व आमदारांनी प्रत्येक बोगीपुढे जावून वारकर्‍यांची सदिच्छा भेट घेतली.

यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुक्ताईनगरच्या नूतन नगराध्यक्षा नजमा तडवी, भाजपा सरचिटणीस सुनील नेवे, सामाजिक कार्यकर्ते, प्रमोद सावकारे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, नगरसेवक पिंटू कोठारी, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पुरूषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, किशोर पाटील, बापू महाजन, सुमित बर्‍हाटे, एजाज खान यांच्यासह मुक्ताईनगरातील भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. प्रसंगी आरपीएफ व लोहमार्गचे कर्मचारी तसेच गोपनीय शाखेचे आर.के.सिंग आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या गाडीला जळगावसह चाळीसगावातही थांबा देण्यात आला आहे.