भुसावळात अतिक्रमण निघणार : पहिल्या दिवशी 49 अतिक्रमणधारकांना नोटीस

0

शनिवारी जामनेर रोडवरील व्यावसायीकांना नोटीस देणार

भुसावळ- शहरातील रस्त्यांवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिका आणि पोलिस प्रशासनाने विक्रेते आणि टपरीधारकांना नोटीस बजावण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेतले आहे. शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा ते यावल नाक्यापर्यंतच्या रस्त्यालगत असलेली दुकाने आणि हातगाडीधारकांना नोटीस देण्यात आली. संबंधितांनी 24 तासात जागा मोकळी करून द्यावी, अन्यथा पालिका आणि पोलिस प्रशासनातर्फे अतिक्रमण काढले जाईल, असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. दरम्यान, शनिवारी जामनेर रोडवरील व्यावसायीकांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.

वाहतूक पोलिसांसह पालिकेची मोहिम
शुक्रवारी सकाळी पालिका कार्यालयात शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांची बैठक झाली. त्यानंतर 11 वाजेपासून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली. पालिकेचे अभियंता पंकज पन्हाळे, सहायक फौजदार सलीम तडवी, राजेश वणीकर, पालिकेचे कर्मचारी राजू नटकर यांनी व्यावसायिकांना नोटीस दिली. दरम्यान. शुक्रवारी पहिल्याच दिवशी 49 व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली. शनिवारी महात्मा गांधी पुतळ्यापासून ते थेट नाहाटा कॉलेजपर्यंत अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांनादेखील नोटीस बजावली जाणार आहे.