नागरीकांना घराबाहेर पडणे झाले कठीण : उत्तर भागात नागरीक झाले त्रस्त : मुख्याधिकार्यांनी दखल घेण्याची गरज
भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ नगरपालिकेने अमृत योजनेतंर्गत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी वर्दळीच्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे मात्र खोदकाम केलेल्या चारीत जलवाहिनीचे पाईप टाकण्यात आले नसल्याने पावसाळ्यात परीसरातील नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शहरातील जळगाव रोड भागातील श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी व परिसरात जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते जेसीबीच्या सहाय्याने मागील 15 दिवसांपासून खोदून ठेवले आहेत. त्यामुळे या परीरसरातील नागरीकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. वाहनेही घराबाहेर काढता येत नसल्याने नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यांतून मार्गक्रमण करतांना वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच शालेय मुलांच्या वाहतुकीसाठी असलेल्या रीक्षा, बसही खोदलेल्या रस्त्यांमुळे घरापर्यंत येत नसल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे.
चिखलातून मार्गक्रमण
खोदलेले रस्ते कंत्राटदाराकडून मातीचा भराव टाकून बुजवण्यात येतात मात्र हे काम योग्य रीतीने होत नसल्याने नागरीकांना चिखलातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे या अशा भागातून मार्गक्रमण कसे करावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काम बंद करण्यास भाग पाडले
शहरात बर्याच ठिकाणी जुन्या जलवाहिनीची तोडफोड झाली आहे तर बीएसएनएलच्या तारा जेसीबीच्या खोदकामामुळे तुटल्या आहेत. यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने चारीचे खड्डे आजच बुजावे अन्यथा काम बंद करावे या मागणीसाठी हुडको कॉलनीतील सुरू असलेले काम प्रा. धीरज पाटील यांनी बंद करायला लावले.
मुख्याधिकार्यानी पाहणी करावी
15 दिवसांपासून सुरू केलेली आधीचे कामे पूर्ण करा नंतरच नवीन कामे सुरू करावी तसेच या कामांची मुख्याधिकार्यांनी पाहणी करावी, अशी मागणी काशीनाथ सोनवणे, प्रीतम पाटील, बंसीलाल कोळी, सुरेश तायडे, अमोल पाटील, गोकुळ बाविस्कर, सुरज चौधरी, मनोज महाजन, सचिन कोळी,चंद्रकांत पाटील, सचिन वारके,
दुर्गेश कोळी व परीसरातील महिलांनी मागणी केली आहे.