काम खोळंबल्याने रस्त्यांची कामे थांबली, परीणामी जनतेचा रोष लोकप्रतिनिधींवर ; तातडीने पाईन लाईन टाकण्याचे आदेश
भुसावळ :- मोठा गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेल्या अटल योजनेचे प्रत्यक्षात काम सुरू न झाल्याने शहरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच आमदारांनी योजनेच्या बैठकीत अधिकार्यांना धारेवर धरत काम का रखडले? याबाबत विचारणा केली. पाईन लाईनच्या कामामुळे रस्त्यांची कामे थांबल्याने जनतेचा रोष आम्हा लोकप्रतिनिधींना सोसावा लागत आहे त्यामुळे बेफिकीरी थांबवून तातडीने कामास सुरुवात करावी, असे आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अधिकार्यांना सुनावले. प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या पुढाकाराने लघू पाटबंधारे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांसोबत बैठक घेण्यात आली.
योजनेच्या कामाअभावी रखडले रस्त्यांचे डांबरीकरण
शहरात अमृत योजनेचे भूमिपूजन झाले मात्र प्रत्यक्षात कामांना सुरवात झाली नाही. या कामांना सुरुवात नसल्याने शहरातील रस्त्यांचा प्रश्न रखडला आहे. याबाबत शुक्रवारी शासकिय विश्रामगृहात आमदार संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर, स्विकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे आदींच्या उपस्थितीत पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पालिकेचे अधिकारी व संबंधीत काम घेतलेल्या जैन इरिगेशन एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील काही रस्त्यांची स्थिती अंत्यत विदारक झाली आहे. दगडी पूल ते सतारे भागाला जोडणारा मामाजी टॉकीज रोड व मातृभुमी चौकापासून पूर्वकडील भागांना जोडणारा सुरभी कॉम्पलेक्ससमोरील रस्त्यांची स्थिती तर अत्यंत बिकट असल्याने सर्वप्रथम या मार्गांवर पाईपलाईन टाकावी. यामुळे या रस्त्याचे काम करणे सोयीचे होणार असल्याचे आमदार म्हणाले.
यांची होती उपस्थिती
अमृत योजनेसाठी तापीपात्रात बंधार्याची उभारणी केली जात असून बंधार्याचे डिझाईनचे काम नाशिक च्या मेरी या संस्थेला देण्यात आले आहे. बैठकीतूनच आमदार सावकारे यांनी मेरीच्या अधिकार्यांसोबत संवाद साधला. आठवड्याभरात डिझाईन मिळणार आहे. प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, एमजीपीचे उप कार्यकारी अभियंता जी. वाय. भंगाळे, विभागीय अभियंता आर. व्ही. अत्तरदे, लघूपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. पाटील, उपअभियंता आर. डी. राणे, कनिष्ठ अभियंता आर. एस. वाघ आदींसह पालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.