सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला ठेंगा ; पालिका प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
भुसावळ: पालिका प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतरित्या बॅनर व होर्ग्डींग्ज लावण्याची भुसावळात शर्यत सुरू झाली आहे मात्र या प्रकारामुळे वाहनधारक एकमेकांना धडकण्याचे प्रकार वाढले असून दुसरीकडे शहराचे मात्र विद्रुपीकरण होत असल्याची ओरड सुज्ञ नागरीकांमधून होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अवैध बॅनर व होर्डिग्ज काढण्याचे आदेश दिल्यानंतरही शहरात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे शिवाय या प्रकारामुळे पालिकेचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बासनात
डिजिटल होर्डिंग्जमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत असल्याने असे होर्डिंग्ज काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकांसह नगरपालिका व स्थानिक प्रशासनाला दिले आहेत मात्र त्यानंतरही शहरात जागो-जागी अवैध होर्डिंग्ज व डिजीटल बॅनर लावलेले दिसून येतात़ विद्रुपीकरण होत असल्यास थेट पालिका बरखास्त करण्याचा इशाराही देण्यात आला मात्र दखल घेईल ती भुसावळ पालिका कसली !
पोलिसांच्या पत्रालाही ठेंगा
महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी, नेत्यांचा वाढदिवस तसेच विविध कार्यक्रम असल्यानंतर चौका-चौकात, नाल्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज लावण्यास अक्षरशः ऊत येतो तर प्रमुख चौकात तर हे फलक पाहण्यासाठी वाहनधारकांची मोठी गर्दीही होते शिवाय वाहनधारक वाहन चालवत असतानाही फलकाकडे पाहत असल्याने अनेकदा किरकोळ अपघातही घडल्याचे प्रकार घडले आहेत़ या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासनाने लेखी पत्रक देऊन विद्रुपीकरण थांबविण्याबाबत पालिकेला कळवले होते़ त्यानंतर पालिका प्रशासनाने दखल घेत काही फलक जबाबदारीने काढले मात्र नंतर मात्र पूर्ववत स्थिती झाली आहे.