पालिकेच्या मोहिमेत पहिल्याच दिवशी 115 बॅनर्स 248 झेंडे जप्त ; नगराध्यक्षांसह पंचायत समिती सभापतींचे चारचाकी वाहन जमा ; प्रांताधिकार्यांनी दिल्या अधिकार्यांना सूचना ; राजकीय पक्षांची चिन्हे झाकली ; परवानाधारकांची शस्त्रे होणार जमा
भुसावळ- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून आचारसंहिता जारी होताच प्रशासन अलर्ट झाले आहे. देशात सात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका पार पडत असून जळगावसह रावेर लोकसभा मतदार संघासाठी 23 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने सोमवारी शहरात पहिल्याच दिवशी 115 बॅनर्स, प्लेक्स तसेच 248 झेंडे जप्त केले तर राजकीय पक्षांचे चिन्ह झाकण्यासह हायमास्टवरील लोकप्रतिनिधींची नावे झाकण्याच्या कामालाही गती देण्यात आली आहे. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी सर्व विभागाच्या प्रमुखांना आचारसंहितेच्या काटेकोर पालनाबाबत सूचना केल्या तर नगराध्यक्षांसह पंचायत समिती सभापतींचे वाहनही जमा करण्यात आले.
बॅनर्ससह झेंडे केले जप्त
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्जसह बॅनर्स तसेच झेंडे काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी सोमवारी शहरातील आरपीडी रोड, जळगाव रोड, यावल रोड, खडका रोड तसेच वरणगाव रोडवरील तब्बल 115 बॅनर्स तसेच 248 झेंडे जप्त करण्यात आल्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले. या कामासाठी जाहिरात, कर लिपिक अनिल रघुनाथ भाकरे, धर्मेंद खरारे, लाईट अभियंता सुरज नारखेडे, पोपट संसारे तसेच आरोग्य विभागाचे निवृत्ती पाटील, प्रदीप पवार, ए.पी.फालक, व्ही.सी.राठोड यांच्यासह 30 कर्मचार्यांचे चार पथक तयार करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांचे चिन्हही झाकले
शहरातील राजकीय पक्षांचे चिन्ह झाकण्यासह विविध भागात लावण्यात आलेल्या हायमास्टवरील लोकप्रतिनिधींची नावे झाकण्यासाठीदेखील सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. मंगळवारपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. शहरातील राजकीय पक्षांतर्फे त्या संदर्भात काळजी घेण्यात येत आहे. विविध विकासकामांसाठी भुमिपूजन केलेल्या कोनशिला व फलक झाकण्याचे काम सुरू असून परवानाधारक व्यक्तींकडे असलेली शस्त्रास्त्रे देखील जप्त केली जात आहेत.
कक्ष राखीव, अधिकार्यांना सूचना
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. शासकीय विश्रामगृहात गृहात एक कक्ष राखीव ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मंगळवारी आचारसंहिता अंमलबजावणी प्रांताधिकारी शासकीय कार्यालयातील प्रमुख अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून सूचना करणार आहेत. शहर भागात आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर तसेच ग्रमीण भागासाठी गटविकास अधिकार्यांना सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षांसह सभापतींचे वाहन जमा
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रमण भोळे तसेच पंचायत समिती सभापती प्रीती मुरलीधर पाटील यांच्याकडे शासकीय वाहन जमा करण्यात आले आहे. आचारसंतिा जारी झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पदाधिकारी अथवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाच्या पदावर असलेल्या पदाधिकार्यांना शासकीय वाहनांचा वापर करता येत नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून सर्व विभागांना सुचना देण्यात आल्या आहेत.
भुसावळात व्हीव्हीपॅटबाबत मार्गदर्शन
आदर्श आचार संहिता तसेच व्हीव्हीपॅट संदर्भात शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोमवारी तहसील कार्यालयात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, विजय भालेराव यांनी निवडणूक उपस्थित होते.