भुसावळात आजपासून पाणीपुरवठा होणार सुरळीत

0

बंधार्‍यात पाण्याचा संचय ; सुरळीत रोटेशनसाठी लागणार आठ दिवसांचा कालावधी

भुसावळ- हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यास विलंब झाल्याने सुमारे आठवडाभरापासून ऐन हिवाळ्यात शहरवासीयांना टंचाईचे चटके सोसावे लागत होते. जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतर 12 रोजी आवर्तन सोडण्यात आले असलेतरी पालिकेच्या बंधार्‍यात सोमवारी रात्री उशिरा पाणी पोहोचल्याने मंगळवारी शहराला पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा रोटेशननुसार होण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे. सुरुवातीला गडकरी नगर, खडका रोड भागात पाणीपुरवठा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आठवडाभरापासून पाण्यासाठी भटकंती
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी पात्रातील बंधार्‍यात अल्प प्रमाणात साठा असतानाच पालिकेने पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकार्‍यांना आवर्तनासाठी पत्रव्यवहार केला होता. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी 10 डिसेंबरला पाटबंधारे विभागाला पत्र देऊन आवर्तन सोडण्याचे आदेश दिले होतेयाच दिवशी सकाळी 10 वाजता भुसावळ पालिकेचा पाणीपुरवठा ठप्प झाला तर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर 12 डिसेंबरला आवर्तन सोडण्यात आले. आवर्तनाची पाणी सोमवारी रात्री उशिरा बंधार्‍यात पोहोचण्यास सुरुवात झाली असून मंगळवारी दुपारून पाणीपुरवठा यंत्रणा कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

नगरसेवकांकडून टँकरने पाणीपुरवठा
पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये नगरसेवकांकडून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात पाणीपुरवठ्यासाठी पालिकेकडे पुरेशा प्रमाणात टँकर उपलब्ध नसल्याने नगरसेवकांनाच ही सेवा द्यावी लागत आहे. प्रभाग क्रमांक 18 च्या नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे व सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे म्हणाले की, दररोज स्व-खर्चातून प्रभागातील नागरीकांना दोन टँकरने आम्ही पुरवठा करीत आहोत. मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.