भुसावळ- शहरातील सतारे भागातील जुना सतारे भागातील ग्रामदैवत मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त शनिवार, 6 रोजी सायंकाळी सहा वाजता बारागाड्या ओढण्यात येणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मरीमाता यात्रोत्सवाची शतकोत्तर वर्षांची परंपरा आहे. जळगाव रोडवरील गुरुद्वारा ते जुना सतारे भागातील मरीमाता मंदिरापर्यंत बारागाड्या ओढल्या जाणार असून मोठ्या प्रमाणावर शहर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
यात्रोत्सवात हजारोंची उलाढाल
शनिवारी, सकाळी मरिमाता मंदिरात अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम होतील तर सायंकाळी सहा वाजता जळगावरोडवरील गुरुव्दाराजवळील मंदिरापासून भगत प्रमोद वाघुळदे व भगले देवेंद्र सपकाळे, सागर ठोके हे बारागाड्या ओढतील. तत्पूर्वी ग्रामदैवताला भगतांकडून प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. दरम्यान, यात्रोत्सवात गृहउपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यासाठी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत लगबग सुरू होती तर या भागातील वाहतूक दुपारनंतर थांबविण्यात येणार असून पोलिसांकडून या भागात बॅरीकेटींग करण्यात येणार आहे तसेच यावल व रावेरकडून येणारी वाहने अन्य मार्गाने वळवण्यात येतील तसेच साकेगाव तसेच वरणगावकडून येणारी वाहनेदेखील अन्य मार्गाने वळवण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सायंकाळी भुसावळ हायस्कूलच्या मैदानावर यात्रोत्सवाच्या निमित्ताने कुस्त्यांचे सामने रंगणार आहेत.