भुसावळ- भारतीय रेल्वेतील ए-1 श्रेणीतील 75 रेल्वे स्थानकांच्या बाहेर 100 फूट उंचीचा तिरंगा ध्वज लावण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे प्रशासनाला काही दिवसांपूर्वीच देण्यात आले होते तर मध्य रेल्वेतील पाचही विभागांतील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर हे ध्वज लावले जात आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकासमोर 100 फुटापेक्षा अधीक उंचीवर लावण्यात आलेल्या पोलवर शुक्रवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता डीआरएम आर.के.यादव यांच्या उपस्थितीत ध्वज फडकवला जाणार आहे. दरम्यान, या ध्वजासाठी गुरुवारी सकाळी रंगीत तालीमही घेण्यात आली. रीमोटच्या सहाय्याने ध्वज शंभर फूट उंचीवर नेण्यात आला व पुन्हा खाली आणण्यात आला. शुक्रवारी खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
एक दिवस आधी होणार ध्वजारोहण
भुसावळ रेल्वे स्थानकासमोर रेल्वे प्रशासनातर्फे 100 फुटापेक्षाही उंचीचा पोल लावण्यात आला आहे. गुरूवारी या पोलवर तिरंगा वरती चढवून त्यांची रंगीत तालीम घेण्यात आली तर पांढरा स्वच्छ माईल स्टील धातूच्या या पोलवर गॅलोनाईजचे कोटींग करण्यात आले असून त्यावर पियुपेंन्ट लावण्यात आला आहे. या पोलवर ध्वज लावण्यासाठी सुमारे 10 कर्मचारी होते. या पोलवर लावण्यात येत असलेल्या ध्वजाचे वजन सुमारे 20 कीलो आहे. 100 फूटापेक्षा उंचीच्या पोलमध्ये एक इलेक्ट्रीक मोटार लावण्यात आली असून ध्वज वर चढविण्यासाठी आधुनिक यंत्रणेचा उपयोग केला जातो. 26 जानेवारीला सर्वत्र ध्वजारोहण होत असलेतरी एक दिवस शहरात शुक्रवारी सकाळी 10 वाजता ध्वजारोहण केले जाणार आहे.