भुसावळात आवर्तनाला विलंब ; टँकरवर मदार

0

रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती ; सत्ताधार्‍यांच्या बेपर्वाईवर शहरवासीयांची घणाघाती टिका

भुसावळ:– शहरवासीयांना तब्बल सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने रणरणत्या उन्हात महिलावर्गाची पाण्यासाठी भटकंती होत असल्याने सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारावर टिकेची झोड उठली आहे. तापी नदीतील बंधार्‍यात आठ दिवस पुरेल इतकेच पाणी आता शिल्लक असून आवर्तनाला विलंब झाल्यास शहरात पाणीप्रश्‍न पेटण्याची चिन्हे आहेत. हतनूर धरणात अवघा 28 टक्के साठा असल्याने व पावसाळ्यास अद्याप दोन महिन्यांचा अवकाश असल्याने प्रशासनाने आवर्तन सोडतांना आखडता हात घेतला आहे. उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमिवर पालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांनी नियोजन करून पालिका मालकीच्या विहिरींची स्वच्छता वेळीच केली असती तर किमान नागरीकांची भटकंती टळली असती, अशी भावना नागरीकांमधून व्यक्त होत आहे. नागरीकांचे होणारे हाल पाहता प्रभागातील नगरसेवकांनीच पदरमोड करून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंतच तापीच्या बंधार्‍यात पाणी
गेल्या दोन महिन्यांपासून शहरवासीयांना टंचाईचे चटके जाणवत आहे. तापीच्या बंधार्‍यातील पाणी उन्हाच्या बाष्वीभवनाने कमी झाले असून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंतच पाणीपुरवठा होईल, असे चित्र आहे तर हतनूर धरणातून मे महिन्याच्या सुरुवातीला आवर्तन न सोडल्यास शहरवासीयांची आणखीन पाण्यासाठी भटकंती होणार आहे.

रेल्वेला जमले मग पालिकेला का नाही?
शहरात रेल्वेचाही बंधारा असून आजतागायत कधी पाण्यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांचे हाल झाल्याचे ऐकिवात नाही वा तांत्रिक बिघाड झाला तरी तातडीने तो दुरुस्त होत असल्याने तसेच भविष्याचे नियोजन असल्याने रेल्वे परीसरात पाणीप्रश्‍न उद्भवत नाही मात्र पालिकेला हे जमत नसल्याने पाणीटंचाई शहरवासीयांच्या पाचवीलाच पूजलेली दिसून येते.

बांधकामे बंद करावीत, मोटार लावणार्‍यांवर कारवाई हवी
शहरावर पाणीटंचाईचे संकट असताना दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी सर्रास बांधकामे सुरू आहेत मात्र पालिका प्रशासन या प्रकाराबाबत मूग गिळून आहेत. ज्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिली, अशी बांधकामे किमान पावसाळ्यापर्यंत बंद ठेवण्यासंदर्भात नोटीस काढायला हवी तसेच नळ आल्यानंतर अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होते शिवाय सर्रास इलेक्ट्रीक मोटारीचा वापर होताना दिसतो, अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.

स्वखर्चाने प्रभागात पाणीपुरवठा -नगरसेवक पिंटू कोठारी
ज्या विश्‍वासाने नागरीकांनी आपल्याला 97 टक्के मतदान करून निवडून दिले आहे त्या मतदार माता-भगिनींना सेवा देणे हे आपले कर्तव्यच आहे. प्रभागात दररोज स्वखर्चाने 20 ते 22 टँकर पाण्याचे दिले जात आहे. नागरीकांनी पाण्याचे महत्व ओळखून त्याचा जपून व काटकसरीने वापर करावा तसेच नळ आल्यानंतर मोटारीचा वापर न केल्यास शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले.

सत्ताधारी बिले काढण्यात मग्शूल -दुर्गेश ठाकूर
सत्ताधार्‍यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पुढील महिन्यात हा प्रश्‍न आणखीन गंभीर बनणार आहे. पाण्याची टंचाई असतानादेखील पालिकेने एकही बैठक न बोलावल्याचे दुःख आहे. जनतेच्या हिताशी सत्ताधार्‍यांना देणे-घेणे नाही मात्र दुसरीकडे पालिकेतून लाखोंची बिले वटवून कागदावरच शहराचा विकास रंगवला जात आहे. सत्ताधार्‍यांच्या आशीर्वादाने पाणी विक्रेत्यांचा धंदा जोमात असल्याचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर म्हणाले.