रेल्वेच्या यशात कर्मचार्यांचाही वाटा -डीआरएम आर.के.यादव
भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात रेल्वे कर्मचार्यांच्या मेहनतीमुळेच रेल्वेला यश मिळाले असून त्यांचा त्यात सिंहाचा वाटा असल्याचे गौरवोद्गार डीआरएम आर.के.यादव यांनी येथे काढले. रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात बुधवारी दुपारी तीन वाजता रेल्वे सप्ताहाचा समारोप झाला. प्रसंगी उत्कृष्ट काम करणार्या रेल्वेच्या 546 कर्मचार्यांचा डीआरएम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून गौरव करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी केले. यानंतर डीआरएम आर.के.यादव मनोगतात म्हणाले की, मध्य रेल्वेतील भुसावळ हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. या विभागातील चांगल्या कामांचे श्रेय कर्मचार्यांचे आहे. भुसावळ, जळगाव, नाशिक रोड येथे चांगली कामे झाली. भुसावळ स्थानकात अमुलाग्र बदल झाला. भविष्यात चांगल्या कामाने विभागाची शान उंचवा, असे आवाहन त्यांनी केले. एडीआरएम मनोज कुमार सिन्हा यांनी डीआरएम यादव यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागाला चार शिल्ड मिळाले, असे सांगितले. महिला कल्याण संघटन अध्यक्षा चित्रा यादव, उपाध्यक्षा रजनी सिन्हा उपस्थित होत्या. यावेळी रेल्वे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.