भुसावळात एक लाख 18 हजारांचा विमल गुटखा जप्त

0

चारचाकीसह आरोपी जाळ्यात ; अन्न-औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून गुन्हा

भुसावळ- शहरात अवैधरीत्या गुटखा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक लाख 18 हजार 800 रुपयांचा प्रतिबंधीत विमल गुटख्यासह सुगंधी सुपारी तसेच एक लाख रुपयांच्या चारचाकीसह आरोपीला अटक करण्यात आली. बुधवारी रात्री ही कारवाई पंधरा बंगला भागात करण्यात आली. या प्रकरणी गुरुवारी दुपारी अन्न -सुरक्षा अधिकार्‍यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी कैलास ललवाणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुटखा तस्करी शहरात ऐरणीवर
शहरात यापूर्वी परराज्यातील गुटखा दाखल होत असल्याने पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असताना काही व्यापारी मध्यप्रदेशातील गुटख्याची वाहतूक करीत असल्याचे आढळून येत आहे. बुधवारी रात्रीदेखील एका चारचाकीत गुटखा येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव रोडवरील एजीएस हायस्कूलजवळ चारचाकी (एम.एच.19 क्यु.2716) ची झडती घेतली असता त्यात एक लाख 18 हजार 800 रुपये किंमतीचा विमल गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली. केसरयुक्त विमलच्या 600 पुड्या तसेच 13 हजार 200 रुपये किंमतीची तंबाखू जप्त करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अनिल कृष्णराव गुजर व त्यांच्या सहकार्‍यांनी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून माहिती घेत पंचनामा केला तसेच चारचाकी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देत आरोपी कैलास ललवाणीविरुद्ध बडगुजर यांनी फिर्याद दिली.